हैदराबाद/महान कार्य वृत्तसेवा
आपण एखादी अशी कामगिरी करावी की थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेलंगणामधील एका तरुणाने आपली ही इच्छा जिद्दीत रुपांतरित केली आणि थेट गिनीज बूकमध्ये पोहोचला आहे. तरुणाने केलेली कामगिरी ऐकल्यानंतर तुमच्या जीभेचे पाणी पळून जाईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे कारण तरुणाने आपल्या जिभेने वेगात चालणारे पंखे रोखले आहेत. फक्त एका मिनिटात त्याने तब्बल 57 इलेक्ट्रिक पंखे आपल्या जिभेने रोखले. आपल्या निर्भय आणि अनेकदा विचित्र स्टंटसाठी ओळखला जाणारा सूर्यापेट येथील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा याला ‘ड्रिल मॅन’ म्हणूनही ओळखले जाते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर क्रांती कुमारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ”क्रांती कुमार पानिकेराने आपल्या जिभेचा वापर करत एका मिनिटात इलेक्ट्रिक फॅनची सर्वाधित 57 पाती रोखली.”
व्हिडीओत लांब केस असणारा आणि रंगीत शर्ट घातलेला ‘ड्रील मॅन’ नावाने ओळखला जाणारा क्रांती कुमार उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्यासमोर अनेक इलेक्ट्रिक फॅन ठेवण्यात आले होते. हे सर्व पंखे टॉप स्पीडमध्ये सुरु होते. वेळ सुरु होताच क्रांती कुनार जिभेच्या सहाय्याने हे सर्व पंखे थांबवण्यास सुरुवात करतो. व्हिडीओत हे पंखे अक्षरश: थांबताना दिसत आहे. त्याची ही कामगिरी पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. काहींना हे गलिच्छही वाटतं. पण कामगिरी पाहिल्यानंतर सर्वजण स्वत:ला टाळ्या वाजवण्यापासून रोखू शकले नाहीत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 60 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. मात्र या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला आहे. या अशा स्टेटमागचा नेमका हेतू काय असी विचारणाही काहींनी केली आहे.
अशा स्टंटमध्ये गुंतलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करत एका यूजरने आश्चर्य व्यक्त केले की, ”त्याची जीभ कशी कापली जात नाही?” आणखी एक म्हणाला, ”हे देखील रेकॉर्डसाठी योग्य का आहे?”. अशा असामान्य रेकॉर्डवर विनोद करत एका युजरने लिहिले आहे की, ”अशी छुपी प्रतिभा, लपवून ठेवा.” दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ”आपल्यात ही प्रतिभा आहे हे कसे कळते?” एकाने क्रांती कुमारची पनिकेराची खिल्ली उडवताना म्हटले की, ”त्याने इंडस्ट्रीयल फॅनसह प्रयत्न करावेत.”
दरम्यान क्रांती कुमारने इंस्टाग्रामवर एक मेसेज शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, तो एका छोट्या गावातून आला आहे जिथे मोठे स्वप्न पाहणं हेदेखील आमच्यासाठी खूप मोठे होते. ”आज चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवणे हे अविश्वसनीय वाटत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मला मान्यता दिल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आणि कृतज्ञ आहे,” असे तो म्हणाला आहे.