महादेव जानकरांचा निर्धार, पुढचा प्लॅनही सांगितला
दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
दिल्लीच्या निवडणुका आहेत त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन ही आमची भूमिका नाही, तर वन नेशन वन एज्युकेशन अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकच शिक्षण पद्धतीनं शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही नाही. भाजपसोबत आम्ही नाही…भाजप सोबत आम्ही नाही हे वारंवार सांगितले आहे. बिहारची निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. किंबहुना मुंबई महापालिकेची तयारी देखील सुरू केलेली आहे. मुंबई सुद्धा आम्ही स्वबळावरून लढून आम्ही आमचे खाते खोलणार, यात काही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केली आहे.
मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू
मुंबई आमची आहे, अशी नेहमी ज्याची मक्तेदारी राहिलेली आहे त्यांना आम्ही यावेळेस धडा शिकवू, असा निर्धारही महादेव जानकर यांनी केली आहे. पुढे बोलतांना त्यांनी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाई बाबत भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, बीड प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मंत्राचा राजीनामा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. कारण त्यावेळी ते होते की नाही? असा प्रश्न आहे. असेही ते म्हणाले.
माझ्याप्रमाणे भुजबळांनी त्यांची स्वत:ची झोपडी बांधावी- महादेव जानकर
ज्या पद्धतीने मी माझी झोपडी बांधली त्याच पद्धतीने भुजबळांनी त्यांची झोपडी बांधावी. दुसऱ्याच्या महालात गेल्यावरती काय परिस्थिती निर्माण होते हे आपण पाहिलं आहे. राज्यात ओबीसी, मराठा, या समाजाने स्वत:ची ताकद दाखवील तरच आरक्षण मिळेल, अन्यथा आरक्षण मिळणार नाही. काँग्रेसने जे केलं तेच भाजप करत असल्याची टीका ही महादेव जानकर यांनी केली आहे. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षाचाच मुख्यमंत्री होईल आणि पुढील काळात तोच अभिवादन करण्यासाठी नायगावला येईल. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका स्वबळावरती आम्ही लढणार आहोत. दिल्ली , बिहार मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार आहोत असेही राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि सर्वेसर्वा महादेव जानकर म्हणाले.