पिंपरी चिंचवड/महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे देशभरासह जगातही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे हे दाखवून दिलं आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कृतीचे सगळीकडे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एक्स पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी संतांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी देवेंद्र फडणवीस यांना जिरेटोप डोक्यावर परिधान करण्याची विनंती केली. मात्र, ”जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच” असे म्हणत जिरेटोप घालण्यास मुख्यमंर्त्यांनी नमपणे नकार दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप नमपणे नाकारल्यानंतर त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून एक पोस्ट जारी केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच’ असे म्हटले आहे. तसेच रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे, असेही सांगितले आहे.