Spread the love

गडचिरोली/महान कार्य वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी या भागातील काही महत्त्वाच्या नक्षलवादी म्होरक्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. यावेळी मुख्यमंर्त्यांच्या हस्ते काही विकासकामांचंही उद्धाटन करण्यात आलं. त्यातच अहेरी-गर्देवाडा बस मार्गाच्या उद्धाटनाचाही समावेश होता. या भागात स्वातंंत्र्यानंतर म्हणजेच 77 वर्षांत पहिल्यांदाच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस धावली. या भागातून आता नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होऊन प्रशासनाचा प्रभाव तयार झाल्याचंही फडणवीसांनी नमूद केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणीस?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाचा बिमोड केल्याची प्रतिक्रिया दिली. ”आजचा दौरा विशेष आहे. स्वातंर्त्याच्या 77 वर्षांत पहिल्यांदाच अहेरी-गर्देवाडा या मार्गावर बस धावली आहे. या बसचे उद्धाटन मी केलं. पेनगोंड्याला एक नवीन आऊटपोस्ट तयार करून आता एकप्रकारे गडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगडशी जोडण्याचे काम आपण सुरू केले आहे. ज्या भागात माओवाद्यांचा मोठा प्रभाव होता तिथे आता आपला प्रभाव तयार झाला आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
”गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला जिल्हा!”
”सगळ्या प्रकारे लोकांनी माओवाद्यांना नाकारलेय. 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना धान्य देणे नाकारले आहे. त्यांनी दिलेले ओळखपत्र पोलिसांत जमा केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नवी पहाट होऊ लागली आहे. याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका. हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे. तसे काम आम्ही सुरू केलं आहे”, असेही मुख्यमंर्त्यांनी नमूद केले.
”कोनसरीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना केले होते. आता त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन मी करतोय. अनेक प्रकल्पांचे आज उद्धाटन-भूमिपूजन होतंय. यातून 10 हजार लोकांना रोजगार मिळालाय. अजून 10 महिन्यांत प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर आणखी 5 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. गडचिरोलीला ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे”, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
नक्षलवादाचा बिमोड
”गेल्या 4 वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातला एकही तरुण किंवा तरुणी नक्षलवादी संघटनेत सहभागी झालेले नाही. त्यांचे वरीष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर शरण येत आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे, नक्षलवादावर नाही, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे, अजून मोडले जाईल”, असेही ते म्हणाले.