मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला येमेनच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. केरळची रहिवासी असलेल्या निमिषावर येमेनचा नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या केल्याचा आरोप आहे. निमिषाने 2017 मध्ये महदीला ड्रग्जचे ओव्हरडोज देऊन त्याची हत्या केली होती.निमिषा आणि महदी येमेनमधील एका खासगी क्लिनिकमध्ये भागीदार होते. महदीने निमिषाचा पासपोर्ट ताब्यात घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. निमिषाला महिनाभरात शिक्षा होईल.
गृहयुद्धामुळे येमेनमध्ये अडकलेली निमिषा
निमिषाने 2008 मध्ये नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केरळमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये तिने केरळच्या टॉमी थॉमसशी लग्न केले. यानंतर दोघेही 2012 मध्ये येमेनला गेले. सना येथे नर्सिंगचे काम करत होती. 2014 मध्ये आर्थिक अडचणींमुळे निमिषाचा नवरा आणि तिची एक मुलगी भारतात परतले. मात्र, निमिषा येमेनमध्ये काम करत राहिली. याच काळात येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले होते. त्यामुळे नवीन व्हिसा मिळणे बंद झाले होते. त्यामुळे निमिषाचा नवरा येमेनला परत जाऊ शकला नाही. 2015 मध्ये, निमिषाने येमेनची राजधानी साना येथे महदीसोबत भागीदारीत स्वत:चे क्लिनिक सुरू केले. येमेनच्या कायद्यानुसार येमेनचे नागरिकच तेथे आपला व्यवसाय सुरू करू शकतात. त्यामुळे निमिषाने महदीची मदत घेतली होती.
महदीने फसवणूक करून निमिषाचा पासपोर्ट जप्त केला
निमिषा 2015 मध्ये एक महिन्याच्या रजेवर केरळला आली होती. निमिषासोबत महदीही आला होता. त्याने निमिषाच्या घरातून लग्नाचे छायाचित्र चोरले होते. नंतर त्याने हा फोटो मॉर्फ केला आणि निमिषाचा नवरा असल्याचा दावा केला. निमिषाच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्याने क्लिनिकच्या मालकीच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केली. त्याने निमिषा आपली पत्नी असल्याचा दावा केला आणि तिच्या कमाईतून वाटा उचलण्यास सुरुवात केली. महदीने निमिषाचा पासपोर्ट जप्त केला आणि दारूच्या नशेत तिचा छळ केला, असा आरोप निमिषाच्या आईने कोर्टात केला होता. त्याने निमिषाला अनेकवेळा बंदुकीच्या धाकावर धमकावले होते. जुलै 2017 मध्ये निमिषाने महदीला भूल देण्याचे इंजेक्शन दिले होते. महदीवर त्याचा काहीही परिणाम झाला नसला तरी निमिषाने त्याला औषधाचा ओव्हरडोज दिला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.