नांदेड/महान कार्य वृत्तसेवा
वाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कोण कोण मोठे मासे आहेत ते आता सापडतील, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे की नाही हे सिद्ध होईल . आता चौकशी सुरु होईल . काही आरोपी फरार आहेत . त्यांचे सीडीआर घेतले जातील . कॉल डिटेल्सवरुन सगळं समोर येईल. कोणी खंडणी मागितली आणि मागायला लावली, त्यासाठी कोणी फोन लावला? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार होण्यासाठी कोणी मदत केली? त्यांना कोणी सांभाळले, हे चौकशीतून समोर येईल. याप्रकरणात मोक्काचे 302 कलम लागेल. सरकारने तसे केले नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते बुधवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अजून अटक का झाली नाही, याबाबत चर्चा झाली. आमच्या सर्वांची इच्छा आहे सगळे आरोपी अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे . त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत. वाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . कोण कोण मोठे मासे आहेत ते सापडतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत . पोलिसांनी शब्द दिलाय काही दिवसात अटक करु. नाही अटक झाली तर आम्ही आहोतच. सरकारने शब्द दिला , मुख्यमंर्त्यांनी शब्द दिला , सगळ्यांना अटक करणार , शिक्षा करणार. या शब्दाला ते खरे नाही उतरले तर आम्ही रस्त्यावर येणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.