इम्फाल/महान कार्य वृत्तसेवा
मणिपूरमध्ये वर्षभरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी माफी मागितल्यानंतर अवघ्या काही
तासात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. राज्याच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद परिसरात अतिरेक्यांनी गोळीबारानंतर बॉम्बफेक केल्याची घटना घडली. यासंदर्भातील माहितीनुसार आज, बुधवारी पहाटे मणिपूरच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद भागात संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांनी गोळीबार केला. पश्चिम जिल्ह्यातील सखल कादंगबंद भागात बॉम्बफेकही केली.
अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला ग्राम स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल या भागात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये 3 मे 2023 मध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून संशयित अतिरेक्यांनी कडंगबंद भागात अनेक हल्ले केले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी 31 डिसेंबर रोजी वर्षभरातील हिंसाचारासाठी राज्याच्या जनतेची क्षमायाचना करून नवीन वर्षात शांततेने एकत्र नांदण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा हिंसाचार उफाळण्याची भीती निर्माण झाली आहे.