वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अजूनही तीन प्रमुख आरोपी सापडत नसल्याने आज मस्साजोगमधील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करत जिल्हा पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. यावेळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर आंदोलक ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती करत आरोपींना कधी पकडणार ते सांगा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला विचारत नाही अशी भूमिका घेतली. यावेळी एसपी नवनीत कावत यांनी आम्हाला अजून दहा दिवस द्या, आरोपींना पकडू अशी ग्वाही देत ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. आज मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आंदोलकांनी पोलिस प्रशासनावर आपला आक्रोश व्यक्त केला. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी गेल्या 22 दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा होण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.
इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला ?
जलसमाधी आंदोलनामध्ये मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी दोन आंदोलक महिलांना भोवळ सुद्धा आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनाचे तीवता लक्षात घेत जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी आंदोलक ग्रामस्थांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरोपी स्वत:हून हजर होतो मग तुम्ही काय करता? वाल्मीक कराड पोलिसाला का सापडला नाही? अशी प्रश्नांची सरबत्तीच गावकऱ्यांनी केली. यावेळी एसपींनी दहा दिवसांची मुदत मागत मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. दहा दिवसात जर तुम्ही सगळे आरोपींना अटक नाही केले तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी दिला.
हत्येमध्ये आरोपी करण्याची मागणी झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार
दरम्यान, पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींची खंडणी मागतिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी कराड नागपूरला असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी करण्याची मागणी झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला. फरार झाल्यानंतर तो सुरवातीला काही दिवस पुण्यात राहिला. त्यानंतर साधारण आठ दिवसापूर्वी तो महाराष्ट्रा बाहेर फरार झाला. त्यानंतर सुरवातीला गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यात फिरत राहिला होता.