Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. शिवाय, कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. त्यामुळे महिनाभरात राजन साळवी याबाबत निर्णय घेणार आहेत. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव-
राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी बहुमताने राजापुरात विजय मिळवला आहे. तर किरण सामंत यांच्या विरुद्ध उभे राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
राजन साळवी यांच्यावर आरोप काय?
ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे. यापूर्वी राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.