मुंबई /महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधकांच्या रडारवर असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमपर्ण केले होते. वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. धनंजय मुंडे हे कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडले आहेत. परंतु, या परिस्थितीतही त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हे फार काही बोलताना दिसत नाहीत. आपल्या पक्षाच्या मंर्त्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होत असताना अजित पवार या सगळ्यावर काहीतरी भूमिका मांडतील असे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचे सध्याच्या काळातील मौन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवार सध्या नववर्षानिमित्त परदेशात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परदेशातून परत आल्यानंतर अजित पवार हे या विषयावर बोलतील, अशी अपेक्षा आहे. वाल्मिक कराड शरण आल्यावर धनंजय मुंडे यांच्याबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेले असताना बीडमध्ये हजारो नागरिकांनी आक्रोश मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेतेही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरुन असतील तर तपास योग्य होणार नाही. यंत्रणेवर दबाव येऊ शकतो, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
हिवाळी अधिवेशन सांगतेच्या दिवशी अजित पवार यांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले. आरोपींना सोडणार नाही, देशमुख कुटुंबाला न्याय देऊ, असे त्यांनी आश्वस्त केले होते. परंतु गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचे थेटपणे नाव घेऊन राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार यांनी गावातून काढता पाय घेतला होता. तेव्हापासून अजित पवार वाल्मिक कराड आणि धनंजय कराड यांच्यातील कनेक्शनबाबत फार काही बोललेले नाहीत. एरवी रोखठोक बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाल्मिक कराड याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आल्यानंतर रात्री केज येथील तालुका सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर सीआयडीकडून आज वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी केला जात आहे. एका बंद खोलीत वाल्मिक कराडची चौकशी केली जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलावले आहे.