xr:d:DAFxILwbyFU:57,j:1117298747872442885,t:23101502
Spread the love

जालना/महान कार्य वृत्तसेवा
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार झाले असून ते आज सीआयडी शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर आरोपींना अटक झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करत आहे. गोड-गोड बोलत आहे, त्या दिवशी राज्य बंद पडलेले दिसेल. तुम्ही गुंडगिरी करणार्‍यांना पोसायला लागलात का? पळून जायला तुम्ही मदत करायला लागलात का? फरार आरोपीला मदत करायला लागलात का? आणखी थोड्या दिवसात पूर्ण राज्यात आंदोलन होणार आहे. आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कोणाची वाट बघू नका, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करा, संदीप क्षिरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे लढत आहेत. राज्यातील सगळ्या आमदारांनी या कुटुंबाच्या पाठीमागे राहावे. आरोपीला पाठीशी घालू नये, असे मनोज जरांगेंनी म्हटले.
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी ते ऐकलं नाही त्यावर अधिक बोलता येणार नाही. सरकारने कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही पाहिजे. अजून आरोपी फरार आहे. या सर्व दहा-वीस जणांना पाठीशी घालणारा कोण? आम्हाला संतोष भैयाच्या प्रकरणातील सर्व मारेकर्‍यांना अटक झाली पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. मग ते कोणत्याही पदावर असोत. मंत्री असो, आमदार असो की खासदार असो, खून करणार्‍या आरोपीच्या पाठीशी जे जे उभे राहील. सरकारकडे येणारे जाणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. जर आरोपींना अटक झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे.