Spread the love

संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या

बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल रेट याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठ येथे संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी वकील शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्याद्वारे पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल केली आहे.
या याचिकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या नेटवर्कचे सर्व पाळेमुळे, राजकीय लागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा यांबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय (राज्य शासन) व पोलीस प्रमुख यांना द्यावे, अशा मागण्या या क्रिमिनल रेट याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत.

याचिकेतील मागण्या खालीलप्रमाणे

  1. मयत सरपंच यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाल्यानंतर देखील आजपयर्ंत सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा.
  2. या घटनेचा मास्टरमाइंड ज्याचे नाव पुरवणी जवाबामध्ये दिलेले आहे. ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो मास्टरमाईंड म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावले उचलून वाल्मिक कराडवर कायदा, हत्येचा कलमानुसार एफ.आय.आर. तात्काळ दाखल करावी व पुढील तपास करावा.
  3. बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्‍वाला मिळणारी राजकीय रसद, मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा, त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये. मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचे भूतकाळातील निकटवर्तीपणा, सहचर्य व लागेबांधे यांचा सखोल तपास करून याप्रकरणी तपास यंत्रणेने योग्य तो अहवाल सादर करावा.
  4. धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचे संबंध पाहता अपहरण व हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही, याबद्दल पावले उचलत राज्य शासनाला, त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तूर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून कायम दूर ठेवण्याबाबतचा आदेश उच्च न्यायालयाने पारित करावा, असा मागण्या करण्यात आल्या आहेत
    बीडमध्ये चार आंदोलने
    दरम्यान, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार वेगवेगळे आंदोलनं आणि उपोषणं सुरु आहेत. आज वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, यासाठी देखील एका महिलेने आंदोलन सुरू केले आहे. तर तीन दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उपोषण केले जात आहे. तिसरे आंदोलन शहरातील शस्त्र परवाने तपासून रद्द करण्यासाठी आणि चौथे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे सुरु आहे.