Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ज्यांनी वाचा फोडली ते आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात पीडित देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरोपींच्या अटकेची मागणी करत आहेत. त्यानंतर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये मोर्चा काढला होता. त्यामध्येही धस यांनी त्यांच्यास्टाईलने भाषण करत बीडमधील दोन्ही मंत्रांवर हल्लाबोल केला. मात्र, दुसरीकडे यासंदर्भाने टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने वेगळाच वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता, सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळी व संतोष देशमुख प्रकरणावर पुन्हा भाष्य केलं आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी पाठक हे जवळपास एक महिना प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते आजच रुजू झाले आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पाठक यांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या खूनासंदर्भात चर्चा केली. बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात धस यांनी चर्चा करुन हे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर, तपास करुन 1 हजार परवाने रद्द करण्याचं आश्‍वासनही धस यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील 8 ते 15 दिवसांत जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई न केल्यास जिल्हाधिकार्‍यांवरच कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असेही धस यांनी म्हटलं. लोकप्रतिनीधींनीही शिफारस केल्याची नोंद असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. माझं नाव कुठं आढळून आल्यास माझ्यावरही करावी. कारण, मी स्वत: अद्याप बंदुक वापरत नाही. केवळ दोन परवान्यांसाठी मी शब्द टाकला होता, तेही श्‍वापदांपासून बचावासाठी म्हणून एका डॉक्टरांना ही बंदुक मिळावी म्हणून आपण शिङ्गारस केल्याचंही धस यांनी म्हटलं.
आका आतमध्ये गेल्याची माहिती नाही
आरोपींच्या संपत्ती जप्तीची कारवाई तातडीने व वेगवान पद्धतीने झाली पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्रांकडे करतो. केवळ लाख, कोटी रुपयांची ही संपत्ती नसून शेकडो कोटींची संपत्ती असल्याचंही धस यांनी म्हटलं. वाल्मिक कराडला अटक करण्यात आली का, याबाबत जोपर्यंत कन्ङ्फर्म माहिती सीआयडीकडून येत नाहीत, तोपर्यंत आका आतमध्ये गेलाय का हे मी सांगणार नाही. अद्याप ते आतमध्ये गेल्याची माहिती माझ्याकडे नाही, असेही धस यांनी म्हटलं.
प्राजक्ता माळी हा विषय माझ्यासाठी संपलाय
तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे, माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. कृपया संतोष देशमुख हत्याप्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे म्हणत प्राजक्ता माळींच्या तक्रारवर अधिक बोलण्यास आमदार सुरेश धस यांनी नकार दिला.