आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याचे पोलिसांना सात पानांचं पत्र
छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यात हर्षकुमार क्षीरसागर याने पोलिसांना सात पानांचे पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. उपसंचालकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या कडून हे सगळं करून घेतलं, सगळी संपत्ती मी संजय सबनीस यांच्या धमकीमुळे माझ्या नावावर घेतली. ही संपत्ती विकून सगळे पैसे वसूल करावे आणि सबनीस याना अटक करावी, अशी मागणी हर्षकुमार याने केली आहे. हे पत्र त्यांनी पोस्टाद्वारे पोलिसांना पाठवला आहे.
अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिताला पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक केली. हर्षकुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत तिच्याकडून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पिताला देखील या घोटाळ्याचा भागीदार केले होते. विमानतळासमोरील उच्चभ्रु सोसायटीमध्ये अर्पिताच्या नावानेच दीड कोटी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता. महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना ते दोघे हजर होते आणि हा फ्लॅट रोखीने विकत द्यावा, अशी गळ हे मंडळी बिल्डरला घालत असल्याचं पुढे आलेला आहे.
कसा केला घोटाळा?
या प्रकरणातील मुख्य आरोपी क्षीरसागर याने क्रीडा उपसंचालकांच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा बनावट वापर केला. त्याने बँकेला बनावट मजकुराचे पत्र पाठवून बँक खात्याला स्वत:चा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे स्वत:च्या खात्यात ट्रान्स्फर केले. हा संपूर्ण प्रकार होत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतरही क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांना किंवा बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा पत्ता कसा लागला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच, आयकर विभागाकडूनही कोणतीही नोटीस न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घोटाळ्यात इतर कोणी सहभागी आहेत का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सरकारी निधीवर असे दुरुपयोग होणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.