बारामती/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 150 मतदार संघात गडबड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर म्हणालेत. तर गडबड असलेल्या मतदारसंघात अजित पवारांचा मतदारसंघ आहे, अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, असा दावा यावेळी उत्तम जानकर यांनी केला आहे, त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर
या सरकारने आत्ता जी विधानसभा निवडणूक घेतलेली आहे, त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदार संघामध्ये यांनी गडबड केली आहे. यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत, पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी एक लाख 80 हजार मिळाली आहेत. त्यापैकी एक तृतीयांश प्रपोर्शन इथे देखील लावलेलं होतं, त्यामुळे युगेंद्र पवार यांची मत ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख 40 हजार आहेत. त्यातील 60000 मते वजा होतात, त्यानंतर 1 लाख 20 मतांवरती अजित पवार राहतात. अजित पवार यांचे फक्त 12 आमदार या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे 107 आमदार निवडून आलेले आहेत असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केले आहे.
त्याचबरोबर आमदार उत्तमराव जानकर यांनी खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत लवकरच निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी आम्ही जाणार असल्याची माहिती बारामतीत माध्यमांशी बोलताना दिली आहे. दिल्लीत आम्ही सगळे मिळून आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहे, असंही ते म्हणालेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 12, तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे, असे 107 मतदार निवडून आले असल्याचा मोठा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.
बारामतीसह जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात एकास 5 अशी सेटिंग करण्यात आली होती. त्यांना 1 लाख 3 हजार मते आहेत. त्यांची जवळपास 30 हजार मते विरोधी उमेदवारांची आहे. ते 13 हजार मतांनी पडले आहे. मी या सर्व प्रकरणाचा सखोल अभ्यास करत आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. तर या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला तयार नसाल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली पाहिजे, पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे असं खुलं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.