कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवा
सलगर-सदलगा महामार्गावर तेरवाड (ता. शिरोळ) येथे भरधाव इनोव्हा गाडीच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी झाले. यात उपचारादरम्यान पत्नी शोभा सदाशिव कोरवी (रा. हेरवाड, ता. शिरोळ) यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला, तर पती सदाशिव कृष्णा कोरवी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या अपघातानंतर इनोव्हा गाडी संशयित चालक अनिल शिवाजी पाटील (वय 45, रा. सोलापूर) याच्याविरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. संशयित चालक अनिल शिवाजी पाटील याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवलेल्या इनोव्हा गाडीने (क्रमांक एम.एच.16.ए.टी.6466) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोरवी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. सदाशिव व शोभा कोरवी फोनवर बोलत असताना झालेल्या या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान शोभा कोरवी यांचा मृत्यू झाला.