हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
सांगली-कोल्हापूर रोडवरील हातकणंगले ते मजले फाट्यापर्यंत रोजच्या वाहतुक कोंडीला वाहनचालक अक्षरश: वैतागले आहेत. मंगळवारी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना या समस्येचा अनुभव आला तरी हातकणंगले पोलीसांनी तातडीने कारवाई न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. हातकणंगलेच्या मध्यवर्ती ठिकाणाहून जाणार्या सांगली-कोल्हापूर रोडवर मानाचा फाकड्या पुल ते तहसील कार्यालयापर्यंत प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असते. सायंकाळच्यावेळी तासतासभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.
सध्या ऊस वाहतूक करणार्या अवजड वाहनांची संख्या वाढल्यामुळे गेली महिनाभरापासून प्रचंड वाहतुक होत आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही या कोंडीत सापडले. त्यांनाही याचा मनस्ताप झाला. त्यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस अधिकार्यांना कडक शब्दात सुनावल्यानंतर बुधवारी सकाळी पोलीसांनी रोडलगतच्या हॉटेल, बार आणि अन्य व्यवसायिकांना रस्त्यावर लावण्यात आलेले बोर्ड काढून घेण्याच्या सुचना केल्या. तर वाहतुक कोंडीला प्रमुख कारण बनलेले रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांना हटविण्यात आले. सकाळी ही कारवाई करण्यात आली. परंतू, सायंकाळी पुन्हा फळविक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडल्याचे चित्र होते. यामुळे पोलीसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.