नागपूर/महान कार्य वृत्तसेवा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच विमानतळाच्या धावपट्टीवरून अधिकार्यांना खडसावले, पण त्याच विमानतळावर आता भटक्या श्वानांचा वावर वाढला असून प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विमानतळ प्रशासनातील अधिकार्यांना तंबी देण्याची वेळ आली आहे. केवळ विमानतळच नाही तर एकूण शहरातच भटक्या श्वानांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
उपराजधानीत भटक्या श्वानांची संख्या वाढली असून गेल्या आठ महिन्यात तब्बल पाच हजाराहून अधिक लोकांना श्वानांनी चावा घेतला आहे. .श्वानांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण असून चाव्यामुळे रेबीजचा धोकाही वाढला आहे. 2021-22च्या तुलनेत 2022-23 मध्ये भटक्या श्वानांनी नागरिकांना चावा घेण्याच्या प्रकरणात 22 टक्क्यांनी वाढ झाली होती. महापालिकेतील रुग्णालयाच्या नोंदीनुसार 2021-22 या वर्षात श्वानांच्या चाव्याची सहा हजार 806 प्रकरणाची नोंद करण्यात आली. तर 2022-23 या वर्षात श्वानांच्या चाव्याची आठ हजार 722 प्रकरणांची नोंद करण्यात आली. दररोज शहरातील किमान 25 नागरिकांवर श्वानांचा हल्ला होत आहे. विशेषकरुन या हल्ल्यात लहान मुलांचा बळी जात आहे. रस्त्यावरील मोकाट श्वानांना खाऊ घालणार्या श्वानप्रेमी नागरिकांसाठी महापालिकेने काही नियम आखून दिले आहेत. मात्र, या नियमांचे कुठेही पालन होत नाही आणि महापालिकेचे देखील याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
मे महिन्यात एका तीन वर्षीय बालकाचा भटक्या श्वानाच्या चाव्यात मृत्यू झाला होता. तर दोन वषार्ंपूर्वी शहरातील दोन डॉक्टरांना देखील श्वानांनी चावा घेतला होता. रात्री आणि पहाटेच्या सुमारास श्वानांचे हल्ले अधिक प्रमाणात होत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे धावण्यासारख्या प्रकारामुळे अपघात देखील होत आहेत. शहरातील विमानतळावर देखील भटक्या श्वानांच्या टोळ्या दिसून येतात. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला देखील याठिकाणी धोका निर्माण झाला आहे.
नियम काय आहे
शहर व लगतच्या परिसरातील कुणीही व्यक्ती किंवा रहिवाशी मोकाट किंवा भटक्या कुत्यार्ंना सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, इत्यादी ठिकाणी अन्न खाऊ घालणार नाही. मोकाट किंवा भटक्या कुत्यार्ंना खाऊ घालणार्या व्यक्तींनी स्वत:च्या घराच्या व्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी अन्न खाऊ घालू नये. जर कोणी व्यक्ती मोकाट किंवा भटक्या कुत्यार्ंना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असेल त्यांनी त्या मोकाट किंवा भटक्या कुत्यार्ंना दत्तक घ्यावे, त्यांना घरी आणावे, त्यांची महानगरपालिकेमध्ये रीतसर नोंद करुन घ्यावी किंवा त्यांना ’डॉग शेल्टर’ मध्ये ठेवावे यासह त्यांचे लसीकरण व आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी असे आदेश न्यायालयाने पारित केले आहेत.