सांगली/महान कार्य वृत्तसेवा
कर्नाटकच्या बंगळूर जिल्ह्यातील नेलमंगल महामार्गावर भरधाव कंटेनर चालत्या गाडीवर कोसळल्यानं एकाच कुटुंबातील सहा जण चिरडून ठार झाले आहेत. मृत हे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीसाठी गावी येत असताना हा भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात चंद्रम इगाप्पागोळ (वय 46), धोराबाई चंद्रम इगाप्पागोळ (वय 40), गणेश इगाप्पागोळ (वय 16), दिक्षा चंद्रम इगाप्पागोळ (वय 10), आर्या चंद्रम इगाप्पागोळ वय (6) असे मृत चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी इगाप्पागोळ (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण जत तालुक्यातल्या मोरबगी या गावचे आहेत.
कशी घडली घटना? : मृत चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे जत तालुक्यातल्या मोरबगी येथील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते बंगळूर या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते. ख्रिसमसच्या सुट्टी निमित्ताने ते आपल्या कुटुंबासोबत भावाच्या पत्नीला घेऊन आपल्या गाडीतून तालुक्यातल्या मोरबगी या गावी सकाळी बंगळूरूमधून निघाले होते. इगाप्पागोळ कुटुंब बंगळूरुमधून काही अंतर पुढे आल्यावर नेलमंगलम येथील राष्ट्रीय महामार्गावर पोचले. या दरम्यान त्यांच्या चालत्या गाडीवर एक भरधाव कंटेनर पलटी झाला. ज्यामुळं कंटेनर गाडीवर पडून गाडी चेपली. यामध्ये गाडीत असणारे इगाप्पागोळ कुटुंब चिरडून जागीच ठार झाले. या घटनेची माहिती समजताचं मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.