Spread the love

मुंबई/महानकार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र सरकारच्या ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एक राज्य, एक गणवेश योजना फसल्याने या योजनेत बदल केल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम जो मिंदे सरकार राबवणार होते तो निर्णय या सरकारने बंद केला. मग आता त्या मंत्र्यांची चौकशी होणार का?, दीपक केसरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांंचा गणवेश देखील सोडला नाही, त्यात देखील मलई खाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंना दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर-
गणवेशाचे कंत्राट 138 कोटीचे होते ते 11 कोटी रुपये कमी करण्यात आले. स्काउट गाईड विषय कम्पलसरी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणेश तयार करायला उशीर झाला. आदित्य ठाकरेंनी निदान माझ्यावर तरी आरोप करायला नको होते. आज जी शिवसेना तळागाळाला जात आहे, त्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहे. आदित्य ठाकरे यांनी वडीलांवर दबाव आणून काँग्रेससोबत जायला भाग पाडले, असा घणाघात दीपक केसरकरांनी केला. राणे यांनी कोकणात शिवसेना संपवली होती, लोक त्यांना हॉटेल देत नव्हते, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आदित्य ठाकरेंनी हे उपकार विसरू नये, अशी आठवणही दीपक केसरकरांनी यावेळी करुन दिली.
दीपक केसरकरांनी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना केली होती सुरु-
राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतंर्गत सुरुवातीला राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला, अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे ही योजना वादात सापडली होती. एक राज्य एक गणवेश या जुन्या योजनेवर निकृष्ट दर्जाचे कापड आणि शिलाईवरून राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसंच वेळेत गणवेशही उपलब्ध होत नव्हते. अर्धे वर्षे उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. या पार्श्‌‍वभूमीवर आता राज्य सरकारने ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेत काही बदल केले आहेत.