बीड/महानकार्य वृत्तसेवा
बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर आरोपांची फैरी झडत आहेत. वाल्मिक कराडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करत कोणालाही सोडणार नसल्याचे म्हटले आहे. बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांची सुद्धा उचलबांगडी करण्यात आली आहे. तथापि, वाल्मिक कराडवर अजूनही कारवाई झाली नसल्याने बीड जिल्ह्यात संताप आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली आहे.
फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय?
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडवरून सरकारवर गंभीर आरोप केला आहे. वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवर आहे, मी पत्ता देतो पोलीस त्याला पकडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हाच धागा पकडत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे , मग हे काय? अशी विचारणा त्यांनी ट्विट करून केली आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला तातडीने अटक झालीच पाहिजे. अटक नाही झाली तर आम्ही सगळे बीडला जाऊन आंदोलन करणार. धनंजय मुंडे यांना देखील कुठलेही खाते मिळता कामा नये, अशी मागणी ट्विट करून केली आहे.
फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?
फडणवीस यांनी सांगितले की, हत्या अतिशय क्रूरपणे झाली असून त्यांच्या डोळ्यांना मार बसला होता. वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील आरोपींबरोबर असलेल्या संभाषणाचे व अन्य पुरावे पाहता गुन्ह्यात सहभाग आहे. कराडचा देशमुख हत्येतही सहभाग असल्याचे एसआयटी चौकशीत दिसून आले, तर त्याचे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले, तरी त्याचा मुलाहिजा न बाळगता ‘मोक्का’ नुसार कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आणि सरकार मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.