समविषम पार्कींगचा भुर्दंड, वाहनधारक संतापले
इचलकरंजी/ महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरात वाहतुक शाखेने सुरु केलेल्या समविषम पार्कींगचा नाहक फटका ग्रामीण भागातून आलेल्या खरेदीदारांना बसत आहे. दोनशे रुपयांची खरेदी करायची आणि पार्कींगचा नियम मोडला म्हणून 500 रुपया दंड भरावा लागत असल्यामुळे वाहनधारक अक्षरश: वैतागले आहेत.
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेने शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावर समविषम तारखेचा पार्कींग नियमाची अंमलबजावणी सुरु केली. मात्र यासंदर्भात वाहनधारकांना पुसटशीही कल्पना नाही. नेहमी प्रमाणे ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणारे नागरिक दुकानाच्या समोर वाहन पार्क करुन खरेदीसाठी दुकानात जातात. काही वेळानंतर खरेदी आटपून दुकानाच्या बाहेर आले. वाहन दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. परगावचे ग्राहक इचलकरंजी शहरात खरेदीसाठी यायला धजावत नाहीत, यापेक्षा जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी या शहरांना प्राधान्य देत आहेत. या कारणामुळे इचलकरंजी शहरातील व्यापार मंदावत चालला आहे.
तर दुसरीकडे व्यापार्यांच्या दारात समविषममुळे इतर वाहने उभी करता येत नाहीत. मोकळ्या असलेल्या रस्त्यावर 22 रुपयाची पावती फाडून किरकोळ विक्रेते, हातगाडीवाले बिनदिक्तपणे रस्त्यावर ठाण मांडत आहेत. याकडे मात्र वाहतूक शाखेने साफ दुर्लक्ष केले आहे.
तसेच शहराबाहेरची वसुली ही व्यापार उद्योगावर परिणाम करत आहे. कर्नाटकातील लोक इचलकरंजी शहरात खरेदी ला येण्यासाठी जवळपास बंद झाले आहेत. दंड भरण्यासाठी इचलकरंजीला येण्यापेक्षा अन्य शहरात खरेदीसाठी गेले तर काय वाईट? असा सवालही वाहनधारकांतून होत आहे.
सोईची बाजारपेठ म्हणून इचलकरंजीकडे पाहिले जाते. खरेदीसाठी आम्ही शहरात येतो मात्र, दंडाचा भुर्दंड वारंवार बसू लागला आहे. त्यामुळे इचलकरंजीत न आलेलेच बरे..!
-दंड भरलेला एक वाहनधारक