Spread the love

शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा
नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग पहावयास मिळणार आहे. आगामी वर्षात जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या 433 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. 24 जानेवारी 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर करावयाची आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये पाच वर्षांची मुदत संपणार्‍या 433 ग्रामपंचायती असून त्यांच्या निवडणुका काही टप्प्यांमध्ये पुढील वर्षी घेण्यात येणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीनंतर या निवडणुकांचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी 2025 ला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.
पुढील वर्षी टप्प्याटप्प्याने मुदत संपणार्‍या हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायती अशा हातकणंगले- दुर्गेवाडी, वठार तर्फ वडगाव, खोची, बिरदेववाडी, कुंभोज, नेज, हालोंडी, जंगमवाडी, चंदूर, कबनूर, माणगाव, माणगाववाडी, रूई, लाटवडे, मिणचे, तासगाव, किणी, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ उदगाव, तिळवणी तर शिरोळ तालुक्यातील आलास, गौरवाड, गणेशवाडी, जैनापूर, तमदलगे, निमशिरगाव, बुबनाळ, शिरटी, शेडशाळ, उदगाव, घोसरवाड, जुने दानवाड, तेरवाड, नृसिंहवाडी, नांदणी, बस्तवाड, मजरेवाडी, शिरदवाड, अर्जुनवाड, कोंडिग्रे, कोथळी, कुटवाड, कवठेगुलंद, घालवाड, चिपरी, दानोळी, हसूर, जांभळी, टाकळीवाडी, दत्तवाड, धरणगुत्ती, यड्राव, शिरढोण या गावांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.