संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार, अशी घोषणा करून महायुतीतील घटक पक्षांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे. त्यामुळे भविष्यात किमान कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ‘एकला चलो रे’चीच भूमिका असेल असे संकेत यातून मिळत आहेत. हाळवणकर यांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागणार, हे मात्र नक्की..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनतेने भरभरुन साथ दिली. केवळ आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा म्हणूनच हे यश मिळालेले आहे हे नाकारून चालणार नाही. भाजपला 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी 41 अशा 232 पूर्ण बहुमताने महायुतीला यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, अशी लोकभावना होती. लाडक्या बहिणींनीही तशा भावना व्यक्त केल्या होत्या. परंतू, जास्त जागा मिळाल्याने भाजपची मुख्यमंत्रीपदासाठी सुप्त इच्छा जागी झाली.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आणले जात आहे. कार्यकर्त्यांच्या मुखातून भाजपचाच मुख्यमंत्री असे वदवले जात आहे. परंतू, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप याबाबतचा कोणताही निर्णय घेतला नाही. हे एकाबाजूने सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही महायुती म्हणून लढलो आहोत, आम्हाला मजबूत सरकार द्यायचे आहे आणि पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका महायुतीसाठी सकारात्मक आहे परंतू, गुरूवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात वेगळीच भूमिका मांडून भविष्यातील राजकीय जोडण्या काय असतील, हे संकेतच जणू दिलेले आहेत. हाळवणकर यांनी भाजप स्वबळावर लढणार असे सांगत याला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदेश असल्याची पुष्टी जोडली आहे. अजून राज्यसरकार स्थापन झाले नाही तत्पुर्वीच भाजपने वेगळी चाल खेळण्यास सुरूवात केली आहे, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजपकडून अशा भूमिका वठवल्या जात असतील तर भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादीसमोर काय-काय वाढून ठेवले असेल याची कल्पना न केलेली बरी, असेच म्हणावे लागेल. तर महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादीला वेळीच सावध व्हावं लागणार हे मात्र नक्की..!