क्लायमेट स्मार्ट युटीलिटीज रेकग्निशन प्रोग्रामकडून प्रशस्तीपत्र
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेचा सातासमुद्रापार टोरंटो कॅनडा येथे सन्मान करण्यात आला. जागतिक स्तरावरील क्लायमेट स्मार्ट युटीलिटीज रेकग्निशन प्रोग्राम अंतर्गत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. 4000 शहरांमधून इचलकरंजी शहराची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विज्ञान जागतिक जल काँग्रेस एक्झिबिशनमध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपायाचा उपयोग करून जलव्यवस्थापनामध्ये कसे बदल घडवता येतात यावर विचार मंथन केले जाते. महानगरपालिकेने सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन व सीआरडीएफसीईटीपी युनिव्हर्सिटी यांच्या मदतीने शहरामध्ये विविध पर्यावरण उपक्रम राबवले आहेत. केंद्रामध्ये 81 केवीचा सोलर प्रोजेक्ट उभा केला आहे. तसेच 750 वृक्षांची लागवड केली आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाचे जापनीज तंत्रज्ञानावर आधारित अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे तसेच महिलांच्या सोयी करता सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकिन वितरण व विल्हेवाट मशीन बसवण्यात येणार आहे. भविष्यामध्ये दर तीन वर्षातून एकदा शहरातील मालमत्ता वरील शौचालयाच्या टाक्या उपसा करून त्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
अभिमानाचा क्षण
मिळालेला पुरस्कार महापालिका कर्मचारी अधिकारी व नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी म्हटले आहे.
यापूर्वी वृक्ष लागवड जलस्त्रोतांचे पुनरजीवन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक इचलकरंजी महानगरपालिकेला मिळाले असल्याचे आयुक्त दिवटे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त प्रसाद काटकर, स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, महेंद्र क्षीरसागर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, शहर समन्वयक प्रवीण भोंगाळे उपस्थित होते.