मागील 200 आणि चालुला 3700 मिळायलाच पाहिजेत – धनाजी चुडमुंगे
शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा
गतवर्षी तुटलेल्या उसाचे 200 आणि चालुला 3700 रूपये दर देत नाहीत, तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, कोयता बंद आंदोलन बांधावरून करा, असे आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथील एल्गार सभेतुन केले. माजी खा. राजु शेट्टी आणि माजी आ. उल्हास पाटील हे देखील आपल्यासोबत आहेत.
चुडमुंगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम पुढे गेला आहे. आता ऊसाला चांगला दर घ्यायचा असेल तर आणखीन 15 दिवस थांबण्यासाठी काय अडचण आहे. आपण या आंदोलनातुन एक चांगला पायंडा पाडू. जेणेकरून, यापुढे 3 ते 4 वर्षात कदाचित आंदोलनही करायला लागणार नाही.
आताच्या निवडणुकीत दोन्ही कारखानदारांनी मताला 1000 रूपये 1500 रूपये वाटले. हे पैसे कुठून आले. त्यांच्या घरात पैशाचे झाड नाही कि छापखाना नाही. हे आपल्याच ऊसाचे पैसे आहेत. ऊस आपला आहे. आपण ऊसाचे मालक आहे. मग ऊसाचा दर ठरवण्याचा अधिकार आपला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आष्टा येथे निशिकांत पाटील यांच्या जाहीर सभेत देखील बोलले, मी 3600 ते 3700 रूपये दर दिला आहे. हे 3100 रूपये दर देतात. यांना अजुन 700 रूपये देता आले असते, असे ते स्वत: जाहीर सभेत बोलले आहेत. मग त्यांना हे जर नेते म्हणत असतील, तर मग मागील 200 आणि चालुला 3700 रूपये देण्यात काहीच अडचण नाही, असे न झाल्यास गुरूवारनंतर रणकंदन सुरू होईल. कारखानदारांच्या समर्थकांना आताच इशारा देतो, आमच्यात आडवे येवू नका, नाहीतर पुढे जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्राम पंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यावेळी तुम्ही उभा राहिला, तर आम्ही प्रत्येकांच्या घरात जावून शेतकर्यांना सांगेन, याच्यामुळे आपला तोटा झाला आहे. याला निवडणुकीत पाडा, असा इशारा जाहीर सभेतुन दिला.
यावेळी अक्षय पाटील, दीपक पाटील, कृष्णा देशमुख, उदय होगले आदींनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीला छत्रपती महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. स्वागत श्रीमंत राकेश जगदाळे यांनी केले. प्रास्ताविक दीपक पाटील यांनी केले तर आभार भोसले यांनी मानले.