इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
गतवेळचे विक्रम मोडीत काढत इचलकरंजीचे राहुल आवाडे, शिरोळमधून डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि अटीतटीच्या लढतीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक विजय मिळविला. यामुळे या तिघांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट तर यड्रावकर आणि आवाडे यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते.
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 जागांवर महायुतीने देदिप्यमान यश मिळविले. शिवसेनेला 4, भाजप 3, राष्ट्रवादी 1 तर त्यांच्या मित्रपक्षा 2 जागा मिळाल्या. कोल्हापुरातून विधानसभेला काँग्रेस हद्दपार झाली. महायुतीच्या या 10 शिलेदारांनी घवघवीत यश मिळवून दिले. या बदल्यात मंत्रीमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला झुकते माप मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून कॅबिनेट दजार्च मंत्रीपद मिळू शकते. किंबहूना ते जवळपास निश्चित मानले जात आहेत. तर शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समर्थक मानले जातात. अडीच वर्षापूर्वी महायुतीचे सरकारच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ दिले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात ते आरोग्य राज्यमंत्री होते. परंतू, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना स्थान मिळाले नव्हते. परंतू, आता पूर्ण बहुमताने मजबूत सरकार स्थापन होत असल्याने यड्रावकर यांना किमान राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला इचलकरंजीमध्ये उर्जितावस्था आणून दिले. पूत्र डॉ. राहुल आवाडे यांना जिल्ह्यात उच्चांकी मतांनी निवडून आणलं. युवकांचा एक आश्वासक चेहरा म्हणून डॉ. राहुल आवाडे यांची ओळख तयार झाली. त्यामुळे युवकांच्या यादीत अग्रक्रमाने राहुल आवाडे यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना राज्यमंत्रीपद देवून कोल्हापूरच्या पूर्व जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विजयाची हॅट्ट्रीक केलेले राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हेही मंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत.
राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट दर्जा
गतवेळी पराभूत होवूनही शिवसेनेसाठी नेटाने मैदानात उतरलेले राजेश क्षीरसागर यांचाही महायुती सरकारमध्ये मोठा सन्मान होण्याची शक्यता आहे. पराभूत होवूनही त्यांना ठाकरे सरकारमध्ये राज्य नियोजन मंडळात कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी राजेश क्षीरसागर यांना त्याच पदावर ठेवून त्यांना सन्मान वाढविला होता. त्यामुळे ही संधी त्यांना पुढेही मिळू शकते.
हाळवणकर यांच्या नावाचीही चर्चा
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची पक्षनिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आली. सातत्याने आवाडे यांच्याशी संघर्ष करून पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी ते बांधील राहिले आणि राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले. या विजयात हाळवणकर यांची पक्षनिष्ठा दिसून आली. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून हाळवणकर यांच्या नावावरही मंत्रीपदाचा खल सुरू असल्याचे कळते. राज्यपाल नियुक्त उर्वरित 5 जागांपैकी भाजपच्या कोट्यातील एका जागेवरून हाळवणकर यांना विधानपरिषदेवर घेवून मंत्रीपदाची संधी देवून आवाडे-हाळवणकर समतोल राखण्याचाही प्रयत्न यानिमित्ताने सुरू असल्याचे कळते.