कुंभोज /प्रतिनिधी
अविरतपणे बावीस वर्ष शिवसेनेचा पाईक असून काही तांत्रिक कारणामुळे मला महाविकास आघाडी करून उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मी खचून गेलो नाही. शिवसैनिक, भीमसैनिक व स्वाभिमानी शेतकरी सैनिक यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली असून, निवडणूक जिंकायचे यात इराद्याने प्रचार केला आहे. मतदार संघातील स्वाभिमानी जनतेने मी एकमेव स्थानिक उमेदवार आहे. याचा विचार करून निवडून देण्याचे भावनिक आवाहन परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. कुंभोज (ता.हातकणंगले) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी माने होते. प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण यादव, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष आप्पा एडके, वैभव जमणे, पुरंदर पाटील, सौ . लेखा मिणचेकर, स्वप्निल भंडारी, शिवाजी पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पार्टीची चार वेगवेगळी पदे असणारे नामदेव साळुंखे यांनी आपल्या सर्वच पदांचा राजीनामा देऊन उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले.
उमेदवार डॉक्टर मिणचेकर यांनी पुढे सांगितले, साडेपाच वर्ष रात्रंदिवस अभ्यास करून मी डॉक्टर झालो आहे. म्हणून मला सर्वत्र डॉक्टर या पदावरून सन्मानाने बोलवतात. मात्र विरोधी उमेदवाराने सहावी नापास होऊन पैशाची खिरापत वाटून डॉक्टर पदवी मिळवलेली आहे. अशा मतदार संघाबाहेरील पाहुण्यांना वीस तारखेला आपापल्या घरी सन्मानाने पाठवा. पुढील दोन दिवसात विरोधी उमेदवार अनेक अमिषे दाखवतील त्यांच्या आमिषाला बळी न पडता, त्यांचे पैसे घ्या, मटण खावा, बटन मात्र स्वाभिमानी पक्षाच्या शिट्टीसमोरचे दाबून विधानसभेत पाठवा. मागील वीस ते पंचवीस वर्षांमध्ये राज्यात प्रत्येक गावात सिमेंट काँक्रीटचे जे बंगले दिसतात. ते निव्वळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या ऊस दराच्या आंदोलनामुळे झाली आहेत. त्यांच्या आंदोलनाला माझा सलाम आहे. त्यांच्या ऊसदर आंदोलनामुळे ऊसाला सर्वाधिक दर मिळत आहे. निवडून आल्यानंतर कोणत्या आघाडीत जायचे हा निर्णय नेते राजू शेट्टी घेतील, तोच निर्णय आम्ही घेणार आहे. मतदार संघातील असलेली संघटनेतील पोरं ही स्वाभिमानी आहेत. त्यांच्या प्रचारामुळेच मी विजय होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रचार सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शिवशक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मिणचेकर प्रेमी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालनासह आभार सुभाष पाटील यांनी मानले.