Spread the love

दादांचं मार्गदर्शन अन् आण्णांच्या जोडण्या….

संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणुकीत राजकारणात टर्निंग पॉईंट देणारी असल्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचंच असा निर्धार करीत संपूर्ण आवाडे परिवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारकाळात अक्षरश: रात्रीचा दिवस करून राबले. आ. प्रकाश आवाडे राजकारणातील चाणाक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांनी या निवडणुकीत आपण स्वत: उभं न राहता पुत्र डॉ. राहुल आवाडे यांना संधी देवून राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी जोडण्या लावल्या. यासाठी राष्ट्रीय पक्ष भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवूनही दाखविली.

हे करत असताना प्रकाशआण्णांनी निवडणुकीपूर्वी ज्या-ज्या घोषणा केल्या त्या-त्या सत्यात उतरवून दाखविल्याचेही या निवडणुकीत दिसून आले. अमित शहा यांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये प्रवेश होईल, असे त्यांनी यापूर्वीही बोलून दाखवलं होतं. कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वीच डॉ. राहुल हेच उमेदवार असतील असे ठामपणे सांगितले होते. तेही त्यांनी घडवून आणलं. तर आता त्यांची आणखीन एक घोषणा बाकी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 उच्चांकी मतांनी निवडून येणार्‍या आमदारांमध्ये डॉ. राहुलचे नाव असेल. आता पहावे लागेल मतमोजणीनंतर डॉ. राहुल यांचे नाव कितव्या स्थानावर असेल.
पतीसाठी अर्धांगिणीची पायाला भिंगरी
पती डॉ. राहुल आवाडे यांची सार्वत्रिक राजकारणातील पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्या अर्धांगिणी सौ. मौश्मी आवाडे यांनीही या निवडणुकीत झपाटून काम केल्याचं पहायला मिळालं. इचलकरंजी फेस्टीव्हलच्या माध्यमातून त्यांनी महिलांच मोठं संघटन करून प्रचाराचं रणशिंग फुंकलं होतं. सकाळी 6 वाजल्यापासूनच भागाभागातील महिला मंडळ, बचत गटातील महिलांच्या गाठी-भेटी घेवून डॉ. राहुल आवाडेंनाच का निवडून दिले पाहिजे, हे सांगत महिलांची मते आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यांच्या या धडपडीला भावजय, सहकार भारती महिला संस्था प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे, भावजय रेवती, सना यांच्यासह सासू माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांच अत्यंत मौलिक मार्गदर्शन आणि साथ मिळाल्याचे दिसून आले.
बंधूसाठी स्वप्निलची धडपड
बंधू डॉ. राहुल आवाडे लहान असलेतरी वडिल बंधू, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी प्रचार काळात रात्रीचा दिवस केला. जनता बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे केले, रोजगार निर्मिती, समाजातील लहान-लहान घटकांना छोटे मोठे उद्योग उभे करण्यासाठी बँकेमार्फत अर्थसहाय्यक करून मदतीचा हात दिलेला आहे. त्यामुळे हा मतदार राहुलच्या बाजूने वळविण्यासाठी स्वप्निल आवाडे यांनी मोठी धडपड केली. जाईल त्या ठिकाणी मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचेही दिसते. त्यांच्या या धडपडीला रवी आणि रोहित या बंधुचीही चांगली साथ मिळाली.
दादांचं मार्गदर्शन
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इचलकरंजी, हातकणंगले या परिसरात सहकाराचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. औद्योगिक वसाहत, सहकारी संस्था, बँका, सुतगिरण्या, साखर कारखाना मोठ्या कल्पकतेने उभारणी करून त्या यशस्वीपणे सुरू केलेल्या आहेत. या माध्यमातून किमान 50 हजार रिकाम्या हातांना काम मिळाले आहे, त्यांचे संसार फुलविले आहेत. यासाठी दादांनी घेतलेले कष्ट न विसरण्यासारखे आहेत. वयोमानाने ते या प्रचारात दिसून आले नसलेतरी सकाळी घरची मंडळी प्रचाराला बाहेर पडत असताना त्यांचा आशिर्वाद घेवून आणि मार्गदर्शन घेवूनच बाहेर पडत होते. दादांचे हे मौलिक मार्गदर्शन आवाडे परिवाराला प्रचारादरम्यान कामी आले. तर उत्तम आवाडे, डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनीही दादांप्रमाणे मार्गदर्शकाची भूमिका बजावली.
कार्यकर्त्यांचीही तळमळ
डॉ. राहुल आवाडे यांना उच्चांकी मतानं निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली धडपड ही डोळे दिपवणारी आहे. ताराराणी पक्ष कार्यालयात बसून अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नव महाराष्ट्र सूतगिरणीचे माजी चेअरमन प्रकाश मोरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनीही मोठ्या तळमळीने काम केले. अगदी सकाळी डॉ. राहुल आवाडे यांची कोठे सभा घ्यायची, सभेच्या ठिकाणी साहित्य पोहोचविण्यापर्यंत नियोजनात व्यस्त दिसून आले. त्यांना या कामात अभय पाटील (किणीकर), हुसेन कलावंत यांची साथ मोलाची होती.