कुरुंदवाड:
शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेला कुरुंदवाड शहरात आज उत्साहात सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या यात्रेने संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे कुरुंदवाड शहरात मोठी चैतन्याची लहर उमटली. यात्रेच्या प्रारंभीच ठिकठिकाणी महिलांनी आमदार यड्रावकर यांचे औक्षण करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या नागरिकांनी त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. जनतेशी संवाद साधताना आमदार यड्रावकर यांनी प्रत्येक मतदाराला नमस्कार करत संवाद साधला. त्यांच्या नेतृत्वाने शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
कुरुंदवाड शहराच्या विकासासाठी आमदार यड्रावकर यांनी आतापर्यंत ३१ कोटी ३८ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे शहरात अनेक ऐतिहासिक कामे पूर्ण होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी ४ कोटी रुपये, मराठा भवन इमारत विस्तारीकरणासाठी २ कोटी रुपये, धनगर समाजासाठी सामाजिक सभागृह: २ कोटी रुपये, मुस्लिम समाजासाठी शादी खाना इमारत आणि प्रार्थना स्थळ २ कोटी ५५ लाख रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये, संत सावता माळी सभागृहासाठी २९ लाख रुपये. या कामांमुळे कुरुंदवाड शहराचा चेहरामोहरा बदलत असून स्थानिक नागरिकांनी या विकासकामांसाठी आमदार यड्रावकरांचे कौतुक केले. या जनसंवाद यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. अनेकांनी झेंड्यांचे निवडणूक चिन्ह शिट्टीचे प्रदर्शन करत आणि घोषणाबाजी करत यात्रेला गर्दी केली होती. कुरुंदवाडमधील या जनसंवाद यात्रेने निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार केले आहे.
आमदार यड्रावकर कुरुंदवाडच्या विकासाचा पाया अधिक मजबूत करतील, असा विश्वास अनेक मतदारांनी व्यक्त केला. या निधीच्या प्रभावी उपयोगामुळे कुरुंदवाड शहर आता महानगराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या ऐतिहासिक कामांमुळे शहराच्या विकासाचे नवे क्षितिज उघडले आहे. या जनसंवाद यात्रेत भाजपाचे जेष्ठ नेते रामचंद्र डांगे, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, माजी नगरसेवक लियाकत बागवान, अर्षद बागवान, इकबाल बागवान, माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड, चंद्रकांत जोंग, रमेश भुजूगडे, उदय डांगे, शरद आलासे, अक्षय आलासे, आर. आर. पाटील, दीपक पोमाजे, महावीर पाटील, जवाहर पाटील, राजू घारे, बापू आसंगे, शरद आलासे, सुरेश बिंदगे, चंद्रकांत मोरे, सोमेश गवळी, दिपक कांबळे, जय कडाळे, चांद कुरणे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.