कावीळ हा विषाणूंमुळे किंवा यकृतावरील दुष्परिणामांमुळे होणारा आजार आहे. या आजाराला वैद्यक शास्त्रात हिपाटाईटीस असे म्हणतात तर संस्कृत मध्ये कामला आणि बोलीभाषेत कामिनी हे संबोधतात.
त्वचेमध्ये , डोळ्यातील पांढऱ्या भागावर तसेच लघवीला गडद पिवळसरपणा दिसणे हे कावीळ या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. त्याबरोबरच उलट्या होने, भूक मंदावणे, झोप जास्त येणे, निरुत्साह अशी लक्षणें सुद्धा दिसून येतात.
कावीळ होण्याची विविध कारणे :
१) जंतुसंसर्गामुळे होणारी कावीळ-(Infective Hepatitis)
जंतुसंसर्ग (Virus) अतिसूक्ष्मजिवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते.
२) हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात व यकृतावर जंतुसंसर्ग निर्माण करतात. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर होते. यकृताला सूज येते.
३) हिपेटायटिस बी, सी – हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरोसिस (Cirrhosis) होतो तसेच यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
हिपेटायटिस बी आणि सी ची कारणे –
१) दूषित रक्त चढवल्याने बी/सी व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात.
२) न उकळलेल्या किंवा र्निजतुक नसलेल्या इंजेक्शनच्या सुया / सिरींज / शस्त्रक्रियेची साधने जर हिपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे बाधीत असतील व नीट र्निजतुक नसतील तर त्यामुळे इतर रुग्णाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकतो.
३) ड्रग अॅडिक्ट – स्वत:ला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा व्हायरस शिरू शकतो.
४) टॅटू – करून घेतल्याने हा व्हायरस शरीरात शिरू शकतो.
५) असुरक्षित शारीरिक संबंध: हिपेटायटिस बी/सी – झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपेटायटिस होतो.
६) आईला ही कावीळ झाली असेल तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकते.
काविळीची इतर कारणं :
१) दारूमुळे होणारी कावीळ- जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये पोटात पाणी होणे (ascites), डोळे पिवळे होणे ही लक्षणं दिसतात.
२) औषधाचे यकृतावरील दुष्परिणाम व त्यामुळे होणारी कावीळ- अनेक औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. उदा. टीबीवरील काही औषधं -(Rifampicin, Isoniazide), कर्करोग, मधुमेहावरील काही औषधे, एड्सवरील काही औषधे, काही वेदनाशामक, काही कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे चालू केल्यावर नियमित लक्ष द्यावे / विशिष्ट रक्ततपासणी करून घेत राहावी म्हणजे कावीळ लवकर लक्षात येते.
३) अवरोधक कावीळ (Obstructive jaundice): पित्ताशयाच्या नळीला पित्ताच्या खडय़ाने वा स्वादुपिंड कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये काविळीबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते.
४) काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात व कावीळ होते.
उदा.- अ) हेमोलॅटिक जॉण्डीस (Hemolytic Jaundice) आजार – रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते.
ब) ऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder) – स्वत:च्या प्रतिकार शक्तीने झालेले आजार – कावीळ
क) Congenital – जन्मजात यकृतातील दोषामुळे झालेली कावीळ
काविळीचे निदान :
१) रुग्णाची डॉक्टरांच्या करवी नीट तपासणी केली जाते. यकृताला किती सूज आहे, हे पाहिले जाते.
२) रक्ततपासणी (CBC , Urine Routine, Liver Function Test , Hep A, B, C E ) करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते. तिची तीव्रता कळते.
३) यूएसजी (USG) सोनोग्राफी करून – लीवरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तानलिका इ. पाहिले जाते. यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे हे वरील तपासणीतून कळते.
काविळीवर उपचार
अ) जंतुसंसर्गामुळे, प्रदूषित पाण्यामुळे : होणाऱ्या काविळीमध्ये हेपाटायटीस ए/ई वर खालील उपचार करावे.
1) रुग्णांनी विश्रांती घ्यावी.
2) साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे.
3) शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे.
4) बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत.
5) यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊसाचा रस प्यावा.
ब ) हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अॅक्टिव्ह असेल तर अॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते.
क) अवरोधक कावीळ ( Obstructive Jaundice) असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो.
सध्या पावसाळा ऋतू सुरु झाला आहे तसेच नद्यांचे पाणी प्रदूषित झालेले असते त्यामुळे पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते उकळून थंड केलेले असावे किंवा फिल्टर केलेले असावे. वर उल्लेख केल्याप्रमाणे लक्षणें आढळून आल्यास त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरांची भेट घ्यावी व त्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
डॉ अतुल शिवाजी पाटील ( बालरोगतज्ञ )
मातोश्री चाईल्ड क्लिनिक शिरोळ कोल्हापूर