मुंबई 6 मे
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याबाबत बोलताना सूचक विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी अभिजीत पाटील यांना थेट आमदारकीचे संकेत दिले आहेत. ‘जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात असून राजकारणही महत्वाचे आहे’, असे फडणवीस या सभेत बोलताना अभिजीत पाटील यांना उद्देशून म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
काही लोकांनी सांगितले की, अभिजीत पाटील आपल्याला कारखाना महत्वाचा आहे, राजकारण महत्वाचं नाही. अभिजीत पाटीलही म्हणाले, हो कारखाना महत्वाचा आहे. मात्र, मी सांगतो अभिजीत पाटील तुम्ही चिंता करु नका. राजकारणही तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या जे मानात आहे आणि यांच्या (जनतेच्या) जे मनात आहे, ते माझ्याही मनात आहे. त्यामुळे योग्य मार्गाने सर्व गोष्टी करू, काळजी करु नका, असे सूचक भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अभिजीत पाटील तुम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिवाराचे प्रमुख आहात. मात्र, या विठ्ठल परिवारामध्ये आता दत्तक म्हणून मी येत आहे. कारखान्यावरील 400 कोटींचे कर्ज, त्या कर्जावर व्याज आणि पुन्हा व्याजावर व्याज असे तुम्ही कितीही मेहनत केली तर तुम्ही यातून बाहेर निघू शकत नाहीत. त्यामुळे याकरता वेगळे ऑपरेशन करावे लागेल. पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये यावर आपण कायम स्वरुपी मार्ग काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना दिले.
दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी शिखर बँकेने कारवाई केली होती. कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली आहेत. विठ्ठल सहकारी कारखान्याने राज्य शिखर बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही कारावाई करण्यात आली. मात्र, यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच यावर मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर अभिजीत पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या घडामोडीनंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अभिजीत पाटील यांच्याबाबत सूचक विधान केल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.