ठाणे, 6 मे
शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भिवंडी लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीमुळे रुपेश म्हात्रे यांना डावलले जात आहे, त्यामुळेच ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रुपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आपण मिटिंगमध्ये असल्याचे सांगत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. तर दुसरीकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधला असता रात्रीपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे रविवारी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर करंजकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.