नागपूर, 4 मे
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या काळातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. यासंदर्भातील मागणी आम्ही वारंवार केलेली त्यानंतर आता केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारी असल्याचे मत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते.
कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. मी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कांद्यावरील निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब, केंद्र सरकारला कळवली होती. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. विरोधकांनी नेहमी याविषयी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसाचे हित पाहते.
7 डिसेंबरला लागू केली होती निर्यातबंदी :
केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 ला कांदा निर्यातबंदी लागू केली होती. याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला. यानंतर सरकारने NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू केली होती. मात्र, याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसेच निर्यातबंदी असताना काही ठिकाणी निर्यातदारांकडून फळांच्या बॉक्समध्ये कांद्याची तस्करी होत असल्याचे समोर आले होते. अखेर रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतला. या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले असून, यामुळे शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र निर्यात शुल्क कमी करण्याची मागणीही होत आहे.