Spread the love

मुंबई, 4 मे
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार दिसले आहेत. गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला असून त्यात दररोज घसरण होत आहे. 16 एप्रिल रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला होता. हा सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांक भाव होता. चांदीचा भावही विक्रमी पातळीवर होता. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर आता सतत घसरण सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
25 एप्रिल रोजी एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे. एमसीएक्सवर गुरुवारी एकदम सकाळी सोने 290 रुपयांच्या घसरणीसह 70 हजार 778 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. सकाळी 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत हे दर 70 हजार 760 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत आले. या चढ उतारादरम्यान सोन्याचा भाव 70 हजार 630 रुपयांपर्यंत गेला होता. चांदी 350 रुपयांच्या घसरणीसह 81 हजार 884 रुपयांवर ट्रेड करत आहे.


मध्यवर्ती बँका करत आहेत सोन्यात गुंतवणूक
मार्केटतज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे. मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या खरेदीला आधार मिळत आहे. विशेषत: आशिया आणि उदयोन्मुख बाजारपेठांतील मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करत आहेत. अनेक मोठ्या बोकरेज कंपन्यांनाही सोन्यामध्ये तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे. कमकुवत डॉलर आणि उत्पन्नात घट यामुळे सोन्याला आधार मिळेल, असा अंदाज बोकरेज फर्मनी व्यक्त केला आहे. वाढत्या आर्थिक आणि भू-राजकीय जोखमींमुळे हेजिंगची मागणीही वाढत आहे.


गुंतवणूक करावी की नाही?
मोतीलाल ओसवाल फर्मने गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं की,आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावादरम्यान सोनं हे गुंतवणुकीचं सुरक्षित माध्यम आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे भाव आता स्थिर दिसत आहेत. अमेरिकन फेडरल रिझ जून महिन्यात पॉलिसी रेट कमी करेल की नाही हे त्यावरून समजू शकेल. ब्लिंकएक्स आणि जेएम फायनॅन्शियल सर्वि‍हसेसमधील रिसर्चचे (कमोडिटी आणि करन्सी) उपाध्यक्ष प्रणव मेर म्हणतात की,मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्वि‍हसेस पीएमआयमधील कमकुवत वाढीमुळे यूएस अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


सोन्याचे भाव 70 हजार रुपयांच्या खाली जातील का?
एचडीएफएसी सिक्युरिटीजमधील कमॉडिटी करन्सी विभागाचे हेड अनुज गुप्ता यांच्या मते, फेड रेटमध्ये कपात करणार नाही अशी शक्यता आहे. हीच बाब सोन्याच्या किमतीत घसरणीसाठी वातावरण निर्मिती करत आहे. सोन्याच्या भावात घसरण सुरूच असल्याचं त्यांनी सांगितलं. हा भाव 70 हजार रुपयांच्या खालीही जाऊ शकतो. असं झाल्यास 69 हजार 500 रुपयांची पातळी महत्त्वाची ठरेल. जर ही पातळीही तुटली तर सोन्याचे भाव 68 हजार 500 ते 68 हजार 800 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
सोन्याचे भाव विक्रमी पातळीपेक्षा खूप खाली आले आहेत. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार, 12 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 73 हजार 958 रुपयांवर पोहोचली होती. आज सोन्याचा भाव 70 हजार 778 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ एका आठवड्यात सोन्यामध्ये तीन हजार 327 रुपयांची घसरण झाली आहे.