Spread the love


संभाजीनगर,18 मार्च
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, जलील यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कॉलर उडवत उत्तर दिले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
चंद्रकांत खैरे म्हणाले, दैनिक सामनामध्ये बातमी आल्यानंतरच माझ्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळालाय असे म्हणता येईल. बातमी लवकरच येईल. एकंदरीत या ठिकाणी तीन चार वेळेस कार्यालयाचे उद्धाटन केले. आम्हाला लाभदायक आहे, म्हणून आम्ही हे कार्यालय घेतलेले आहे. आता देखील बनवायचे काम सुरु आहे. विजय कोणचा होईल? या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी कॉलर उडवत शिवसेनाचा होईल, असे सांगितले आहे.
तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करतो
इम्तियाज जलील यांच्याबाबत बोलताना खैरे म्हणाले, कसले आव्हान आले. आव्हान वगैरे काही नाही. सगळ व्यवस्थित आहे. आम्ही सगळी तयारी करतोय. आम्ही स्ट्राँग आहोत. आम्हाला कोणावर टीका देखील करायची नाही. आपण आपले काम करायचे. पुढचे चित्र जोरात आहे. 100 टक्के भगवा फडकणार आहे. आत्ताच फडकतोय. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करतो, असे चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांना सागितले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेवरुन उमेदवारी देणार आहे. अद्याप ठाकरे आणि शिंदेंचा उमेदवार ठरलेले नाही. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिरंगी लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.
इम्तियाज जलील उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले?
पाच वर्षे संसदेत प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी माझ्या मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध जोरदार लढा दिला. आता पुन्हा मी लोकांशी संपर्क साधेन आणि त्यांना मी काही चांगले केले असे वाटले तर ते नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहतील. माझी खासदार म्हणून सुरुवातीची दोन वर्षे कोरोनामुळे पूर्णपणे वाया गेली. लोक मला त्यांची सेवा करत राहण्याची संधी देतील अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली.