Spread the love

माजी नगरसेवक मोहन कुंभार यांची तक्रार

सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्तसेवा

 

               इचलकरंजी येथील माजी नगराध्यक्षा मेघा चाळके यांचे पती सागर चाळके यांनी सत्तेचा गैरवापर करुन बेनामी माया जमवली आहे.  यशोदीप मागसवर्गीय औद्योगीक संस्थेची मालमत्ता बेकायदेशीरपणे पत्नी मेघा चाळके यांच्या नावाने हडप केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍याकडे केली आहे. प्रसंगी ईडी दारही ठोठावणार असल्याची माहिती माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर या प्रकरणाची एक महिन्यात चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही कुंभार यांनी दिला आहे.

               मागासवर्गी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्य केले. मात्र येथील  स्टील उत्पादन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली यशोदीप मागासवर्गीय संस्था आजही बंद स्थितीत आहे. संस्थेच्या नावाखाली शासनाची फसवणूक करुन करोडे रुपयाचा अपहार केला आहे. लेखापरिक्षकांनीही अपहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. तर सदर संस्थेची मालमत्ता मेघा चाळके यांनी त्यांचे मावस दिर संचालक विनायक घाटगे यांच्या मध्यस्थीने बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात 2 कोटी 49 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप कुंभार यांनी पत्रकार बैठकीत केला.