Spread the love


मुंबई,22 ऑगस्ट
राज्याच्या कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कांदा खरेदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शाह आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचेही आभार मानले. ’केंद्राने नाफेडद्वारे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. अशाप्रकारे पूर्वनिर्धारित 2,410 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय पहिल्यांदाचा घेण्यात आलाय’, असे शिंदे म्हणाले.
गरज भासल्यास केंद्र सरकार आणखी मदत करण्यास तयार : राज्याला गरज भासल्यास आणखी मदत करण्यास केंद्र सरकार तयार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच या प्रकरणी केंद्र सरकार शेतकèयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. ’मी पियूष गोयल आणि अमित शाह यांच्याशी चर्चा केलीय. राज्याला गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य केले जाईल’, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांना टोला : ’शरद पवारांनी केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत करावं’, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ’शरद पवार कृषीमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तेव्हा असा निर्णय घेण्यात आला नव्हता’, असा टोला एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना लगावला. ’तसेच कोणीही या प्रश्नावर राजकारण करू नये. केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करायला हवं’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू : ’कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत’, असे एकनाथ शिंदेनी सांगितले. ’या दृष्टीने चर्चा झाली असून काही निर्णय घेण्यात आले आहेत’, असे ते म्हणाले. या सोबतच आम्ही कांद्याची महाबँक ही संकल्पना देखील राबवत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कांद्यासारख्या नाशवंत वस्तू जास्तीत जास्त टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असून यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतले जात आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.