लखनौ ,20 ऑगस्ट
सुपरस्टार रजनीकांत हा ’जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूपीमध्ये आहेत. रजनीकांतने शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर रविवारी रजनीकांतने समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली आहे. अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी रजनीकांतने दिवंगत मुलायम सिंग यादव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याशिवाय रजनीकांत हा राम मंदिरात अयोध्येला देखील जाणार आहे.
अखिलेश यादव आणि रजनीकांतमध्ये आहे खूप चांगली मैत्री : अखिलेश यादव यांच्या भेटीबाबत रजनीकांतने सांगितले की, मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान आमची भेट झाली होती. तेव्हापासून आमच्यात मैत्री झाली. आम्ही अनेकदा फोनवरही बोलतो’. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना रजनीकांतने म्हटले की, अखिलेश अखिलेश हे माझे मित्र आहेत. म्हणूनच मी भेटायला आलो होतो आणि ही भेट खूप छान होती’. दरम्यान रजनीकांतने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतची शनिवारी झालेली भेट अद्भूत असल्याचे सांगितले. याशिवाय रजनीकांतला माजी मुख्यमंत्री मायावतीला तुम्ही भेटलात का? असे विचारले असता, त्याने यावर नाही सांगितले.
’जेलर’ चित्रपटाचे प्रमोशन : विशेष म्हणजे रजनीकांत सध्या त्यांच्या ’जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशच्या दौèयावर आहेत. यापूर्वी त्याने उत्तराखंडमधील अल्मोडा येथेही भेट दिली होती. लखनौला पोहोचल्यानंतर त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली, यावेळी त्याने मुख्यमंत्री योगी यांच्या पायाला स्पर्श केला. तसेच शनिवारी दुपारी रजनीकांतने पॅलासिओ मॉलमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासोबत ’जेलर’ चित्रपट पाहिला. त्यानंतर रविवारी रजनीकांत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. अखिलेश यादव यांनी रजनीकांतच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अखिलेश यादव हे रजनीकांतपासून प्रभावित : अखिलेश यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ते म्हैसूरमध्ये शिकत होते तेव्हापासून ते रजनीकांतपासून खूप प्रभावित झाले होते. त्यानंतर ते रजनीकांत यांनाही भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली. रजनीकांतला आपल्या निवासस्थानी भेटून त्यांना खूप आनंद झाला’. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे. रजनीकांतने अखिलेश यादव यांना मिठी मारली आहे.