मुंबई,6 जुलै
अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै 2023) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आता शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. कारण अजित पवार यांनी चिन्हावर आणि पक्षावरही दावा सांगितला आहे. या सगळ्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटले आहे उद्धव ठाकरेंनी?
’महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्यामुळेच त्यांनी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली उद्या हे महाराष्ट्र फोडतील तेव्हा त्यांना विरोध करणारं कुणी नको आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार सुरु आहेत. ही लढाई अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे. शिवसेना नको म्हणून शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला. ’ असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट
रविवारी जेव्हा राज्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका पार पडल्या. यापैकी एक शरद पवार गटाची होती तर दुसरी अजित पवार गटाची. अजित पवारांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचाच मुद्दा उपस्थित केला. तर शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर यथेच्छ टीका केली. यापुढच्या दिवसांमध्येही हे चित्र बघायला मिळणार आहे. अशात आता उद्धव ठाकरे यांनी हे सगळे घाणेरडे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपाला महाराष्ट्र फोडायचा आहे असाही आरोप केला आहे.