मुंबई,6 जुलै
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांसोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच आपल्याला 40 पेक्षा जास्त राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांच्या गटाने केला आहे. या घडामोडींनंतर शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे तसंच एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनाम्याच्या या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसंच त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
’त्यांनी विकासाला साथ दिली, ते प्रभावित झाले. त्यांनी युतीत यायचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला विश्वासात घेण्यात आलं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला पुढे नेत आहोत, सोबतच विकास करत आहोत. अजितदादांनी स्वीकार केलं मागच्या एका वर्षात विकास झाला आणि आम्ही विकासाला साथ देत आहोत. राज्यात डबल इंजिन सरकार आहे अजितदादांचेही ते विचार आहेत’, असं मुख्यमंत्री म्हणाले.
’माझ्या राजीनामाच्या अफवा आहेत. कोणत्या थराला जाल, तुमच्या पक्षाची हालत बघा, आत्मचिंतन करा. दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा तुमचं घर शाबूत आहे का बघा. तुमचं घर तुटलं आहे तुमच्या या वागणुकीमुळे’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
’माझी शिवसेना नेत्यांसोबत बैठक झाली. बेरजेचं राजकारण आहे. सरकार स्थापन झालं तेव्हापासून यांचं तेच सुरू आहे. तिन्ही पक्ष मिळून 200 च्या वर आकडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आम्हाला पाठिंबा आहे. अमित शाह कायम लक्ष देतात. आमच्या प्रस्तावांना मान्यता देतात. हे सरकार मजबुतीने काम करत आहे, त्यामुळे यांच्या पोटात दुखत आहे’, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
’आम्ही सत्ता सोडून निघून गेलो, आम्हाला माहिती नव्हतं काय होणार आहे. भूमिका घेऊन सत्तेतून बाहेर पडलो होतो. आम्ही सत्तेच्या लालसेपोटी खूर्चीच्या लालसेपोटी निर्णय घेतला नव्हता. आमच्या आमदारांनी तर पुढे काय होईल याची परवाही केली नव्हती’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
’अजित पवार आल्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं आहे. आमचं सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठीचं सरकार. मी ही सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्याचा मुलगा. राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामं सुरू आहेत. लोकांना काम आणि विकास पाहिजे, यासाठीच अजित पवार आले आहेत. घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांकडे कोण जातं का? ही अफवा आहे, संपर्कात कोण आहे त्यांची नावं सांगावी. गुवाहाटीला असल्यापासून ते हेच बोलतायत’, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर साधला.
जागा वाटपाचा फॉर्म्युला
’लोकसभेमध्ये आमच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकू. विधानसभेत आताच आमच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आहेत. ऐतिहासिक रेकॉर्डब्रेक निवडणुका होतील, म्हणून ते घाबरले आहेत. जे आहेत त्यांच्या जागा तशाच राहतील, उरतील त्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.