Spread the love

कोल्हापूर 6 जूलै

जिल्ह्याच्या राजकारणात आता ट्रिपल एम म्हणजेच महाडिक मंडलिक आणि मुश्रीफ यांचा एम फॅक्टर आता दिसणार आहे. यामुळे सतेज पाटील हे एकटे पडणार असे दिसत आहे. यामुळे सहकार क्षेत्रात देखील मोठे बदल होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. जिल्ह्यातील एम (एम) फॅक्टर कसे चालेल, हे जाणून घेऊ.

‌’शरद पवार एके शरद पवार‌’ असा नारा दिलेले आमदार – राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची मुहुर्तमेढ रोवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काहीही झाले तरी ‌’शरद पवार एके शरद पवार‌’ असा नारा दिलेले आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात खासदार संजय मंडलिक सहभागी झाले. रविवारी राज्यात भाजप – शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येत सरकार स्थापन केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण बदलले आहे. जिल्ह्यात भाजपचे खासदार धनंजय महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे तिघेजण एकत्र आले आहेत. यामुळे जिल्हा सत्ताधारी गटाची ताकद वाढली आहे.

जिल्ह्यात चालणार एम फॅक्टर- खासदार संजय मंडलिक हे ‌‘मविआ‌’ तून जरी निवडून आले असले तरी सध्या ते मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी आहेत. संजय मंडलिक यांची तालुक्यात साखर कारखानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. जिल्ह्यात माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, शोमिका महाडिक गटाची ही ताकद मोठी आहे. गोकुळ आणि अन्य संस्थेच्या माध्यमातून त्यांचे प्रत्येक तालुक्यात ताकद दिसून येते. तर आमदार हसन मुश्रीफ यांची कागल, राधानगरी-भुदरगडमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे भाजप  शिंदे गट व अजित पवार गट अशी कागल तालुक्यात मोठी राजकीय ताकद निर्माण झाली आहे.यामुळे पुढील लोकसभेच्या निवडणुकीत आपणच उमेदवार आहोत असे म्हणत खासदार संजय मंडलिक यांनी तयारी सुरू केली आहे. युती धर्म म्हणून महाडिक यांची त्यांची साथ मिळणारच आहे. मात्र त्यांच्यासोबत आता हसन मुश्रीफ यांची देखील ताकद मिळणार आहे. तिन्ही गटाचे तीन मातब्बर नेते आहेत. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा पाहता ते नेते एकत्र येतील का ? कोण कुणाशी जमवून घेणार? तिघे एकत्र राहणार का कोल्हापूरचा सुरू असलेले गटाचा राजकारण पुढे चालू ठेवणार याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. याचे थेट परिणाम सहकार क्षेत्रावर देखील भविष्यकाळ झाल्यास कोणाला नवल वाटण्याचे कारण नाही.

सहकारामध्येही उलथा पालथ होण्याची शक्यता- सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची जय वीरूची जोडी म्हणून सगळीकडे बोलले जात होते. तर दोघांनी मिळून जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले. सध्या गोकुळमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात शौमिका महाडिक हे आहेत. तर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे हसन मुश्रीफ यांच्या गटाचे आहेत. दरम्यान येत्या भविष्यकाळात गोकुळवर सुरू असलेली लेखापरीक्षांची कारवाई थांबवण्यासाठी हसन मुश्रीफ महाडिक यांच्यासोबत गेले आहेत. तर गोकुळमध्ये सत्तांतर होऊ शकते असे सध्या दिसत आहे. यापुढील काळात सतेज पाटील यांना एकट लढावे लागेल का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.