Spread the love

सोलापूर,2 जुलै

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत हे शनिवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र राज्याच्या महाभारतामधील शकुनी मामा म्हणजे शरद पवार, असे खोत यांनी टीकास्त्र सोडले. शरद पवारांनी महाराष्ट्र राज्यात सोंग घेत, भाजप शिवसेनेचे सरकार घालवलेले होते असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. शरद पवारांनी गुगली टाकली असे म्हटले होते. त्या गुगलीवर सदाभाऊ खोत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अपघातात मृत्यू झालेले मृतात्मे हे देवेंद्रवासी होतात. शरद पवारांच्या या वक्तव्याला रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले आहे.महाराष्ट्र राज्यात औरंगजेब असताना त्याच्या घोड्यांना, सैन्याला पाणी पीत असताना पाण्यात संताजी धनाजी दिसत होते. तसे शरद पवारांना समृद्धी महामार्गावर अपघात झाला की, मृतात्म्यात देवेंद्र फडणवीस दिसायला लागले आहेत. ही पवारांच्या राजकीय जीवनातील मोठी शोकांतिका आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पवारांच्या गुगलीवर सदाभाऊ खोत : सोलापुरात शनिवारी रात्री कासेगाव येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या गुगलीवर देखील उत्तर दिले आहे. शरद पवारांनी गुगली टाकली होती, असे वक्तव्य केले होते. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो, असेही शरद पवार म्हटले होते. मुळात शरद पवार हे क्रिकेटचे अध्यक्ष होते ते बेकायदेशीर होते. त्यांना क्रिकेटबद्दल काहीही महिती नसताना ते क्रिकेटचे अध्यक्ष कसे झाले? तसेच महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष देखील होते. त्यांना कुस्तीमधील कोणता पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कुठे कुस्त्या गाजवल्या आहेत? त्या माझ्या काही ऐकण्यात आल्या नाहीत. पण जिथे पैसा असतो तिथे पवार घराणे असते, असे टीकास्त्र सदाभाऊ खोत पवार घराण्यावर सोडले.

गांजाच्या शेतीची परवानगी : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना आपल्या भाषणातून गांजाच्या शेतीबाबत माहिती दिली. तसेच माध्यमांना देखील माहिती देताना सांगितले. सरकारकडे गांजाची शेतीची परवानगी मागणार आहेत, कारण शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत कोणत्याही प्रकारचे पीक लावले. त्याला कर्जाचे पीक येत असेल तर गांजाची शेती करण्यासाठी काय हरकत आहे? निदान शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर वाचतील, असे सदाभाऊ खोत यांनी माहिती दिली.

संजय राऊतांवर टीका : शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत बोलताना शापित महामार्ग असे समृद्धी महामार्गाला संबोधले होते. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर बोलणे म्हणजे शापच ठरेल, अशी टीका करत राऊतांना उत्तर दिले आहे. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सकाळी उठल्याबरोबर घुबडाला बघितले तर, दिवस वाईट जातो की काय? अशी चिंता ग्रामीण भागातील शेतकरी करत होते. कुणाचा मृत्यू होतो की काय? अशी चिंता लागून राहत होती. घुबड बघितले तर दिवसभर जेवत नव्हते, असे घुबडाचे उदाहरण देत सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांवर टीका केली आहे