Spread the love

मुंबई,2 जून

आज राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राजभवनमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून ते पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसकट राष्ट्रवादीच्या 40 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनीदेखील टिवटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

‌‘शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर ! देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वत:च्या पायात अडकून पडून रन आऊट. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!‌’ असे म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या उध्दव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज सकाळी अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली होती. या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी सकाळीच बैठकीचे नियोजन माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली होती, पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार असल्याचे ते म्हणाले. शिवाय येत्या 6 जुलैला बैठक बोलावली असून सकाळी 10 वाजता बैठक होणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, त्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर नारायण राणे यांनी शरद पवारांच्या गुगलीवर अजित पवारांनी सिक्सर मारल्याचे म्हटले आहे.