पुणे, 9 जून
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर धमकीच्या प्रकरणानंतर काही घडल्यास याला राज्याचे आणि देशाचे गृहखाते जबाबदार असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. आता अजित पवार यांनी धमकी देणाèया सौरभ पिंपळकरचा मास्टरमाइंड कोण याचा तपास करावा अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांना सौरभ पिंपळकर नावाच्या अकाउंटवरून धमक्या देण्यात आल्या. तुमचा दाभोळकर करू असं म्हटलं. त्याच्या अकाउंटवर भाजपचा कार्यकर्ता असल्याचं लिहिलंय. आता तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही माहिती नाही, पण तसा उल्लेख आहे. त्यांच्या पक्षाने तसे बोलायला सांगितलेय का? संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला.
धमकी देणाèयांना अटक व्हायला हवी. कोण मास्टरमाइंड, कुणी हे करायला भाग पाडलं, त्याच्या मोबाईलची तपासणी करावी अशी मागणी अजित पवार यांनी दिली. शरद पवार यांना धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, पक्ष जरूर वाढवा पण तो वाढवताना कारण नसताना इतर राजकीय नेत्यांची बदनामी करायची. त्यांची जनमाणसातली प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढीस लागलेत त्याचा धिक्कार करतो. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की इतरांनी चुका केल्या म्हणून आपण करायच्या नाही. पोलिसांनी संबंधितांना अटक करावी. नियमानुसार कारवाई करावी. त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे.