Spread the love


मुंबई 9 जून
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिवटरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील तसेच केंद्रातील गृहमंत्रालयालवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंनी पवारांना मिळालेल्या धमकी प्रकरणामध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय आणि राज्यातील गृहमंत्रालयाची असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. यावेळेस सुप्रिया सुळेंना मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या गुन्ह्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राज्यात लक्ष घालावं अशी मागणी केली.
महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण केल्याने…
हिंदू-मुस्लिम तणावाचे वातावरण दिसतंय मागील काही दिवसांमध्ये तुम्ही याकडे काही राजकीय दृष्टीने पाहताय का असा प्रश्न सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, ‘शक्यता नाकारता येत नाही,‘ असे उत्तर दिले. तसेच पुढे बोलताना, ‘ही सरकारची जबाबदारी असते. सरकारचे इंटेलिजन्स असते. आम्हीही अनेक वर्ष सत्तेत राहिलो आहोत. काही दिवस नाही तर अनेक महिनेही हे इंटेलिजन्स मिळत असते. बंटी पाटील दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूरबद्दल एका पत्रकार परिषदेत बोलले होते. बंटी पाटील यांना कळते पण गृहमंत्रालयाला कळत नाही या इंटेलिजन्सबद्दल. सोयीप्रमाणे यांचे इंटेलिजन्स फेल्युअर होतेय असे दिसतेय. महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण केल्याने कोणाला काही मिळणार नाही. राज्यात गुंतवणूक येणार नाही, विश्वासाच्या नात्याने जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना किती असुरक्षित वाटेल. हा कोणत्याही समाजाची नाही तर नागरिकांचा विषय आहे,‘ असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी?
शरद पवारांसाठी सुरक्षेची मागणी केली आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, ‘शरद पवारांची सुरक्षा हा गृहमंत्रालयाचा विषय आहे. ते देशाचे नेते आहेत. त्याबद्दल गृहमंत्रालयाने लक्ष घालावे. याबद्दल मी काय सांगणार?‘ असा प्रतिप्रश्न विचारला. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे का असे विचारले असता, ‘मी जी धमकी आलीय त्याबद्दल तक्रार केली त्यावर त्यांनी लवकरच कारवाई करु असे आश्वासन दिले आहे,‘ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढतेय हे गृहमंत्रालयाचे अपयश
मुंबईतील हॉस्टेलमधील तरुणीची हत्या, मीरा रोडमधील हत्याकांडप्रकरणाचा संदर्भ देत कायदा सुव्यवस्था ढासाळली आहे. गृहमंत्री अपयशी ठरलेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर सुप्रिया यांनी, अर्थातच हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. ज्या पद्धतीने लिव्हइन पार्टनरची हत्या केली जाते. ज्या पद्धतीने तो तिच्या मृतदेहाचे तुकडे शिजवत होता हे मी चॅनेलवरच बातम्यांमध्ये पहिले. किती क्रूर आहे ही गोष्ट. हॉस्टेलमध्ये घडलेली घटनाही क्रूर आहे. बेटी बचाव बेटी पढाओचे नारे देता. मग या देशातील मुलींसाठी तुम्ही करताय तरी काय? ज्या मुलींनी आपल्याला मेडल आणले त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायला 2 महिने लागले? हा मुलींना मिळालेला न्याय आहे का? या मुलींवर अन्याय होतोय. यांचे सरकार आल्यानंतरच हे होतेय. कुठेतरी मुली पळून जायच्या घटना होतात, मग सरकार करतेय तरी काय?‘ असे प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला.
मी अमित शाहांकडेही मागणी करते की…‘
महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. म्हणून मी अमित शाहांकडेही मागणी करते की कृपया महाराष्ट्रातही लक्ष द्या. महाराष्ट्रातील गृहमंत्रालयामध्ये काय सुरु आहे?‘ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांकडे असलेल्या मंत्रालयाची दखल थेट केंद्राने घ्यावी अशी मागणी केली. निलेश राणेंचे टिवटही चर्चेत आहे असे म्हणत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘मी ते टिवट वाचलेले नाही,‘ असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले तसेच आपल्याला जे काही सांगायचे आहे ते आपण पोलिस आयुक्तांना सांगितले आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.