कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मुंबईत काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यावर पदाधिकारी आग्रही राहिले. या आढावा बैठकीत कोल्हापूर लोकसभेसाठी चर्चा करताना आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, बाजीराव खाडे आणि चेतन नरके यांच्या नावाची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ‘कोल्हापूर लोकसभेसाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणू’असा निर्धार काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी यावेळी केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगानेही चाचपणी झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत सध्या काँग्रेसच्या जिल्हानिहाय आढावा बैठक होत आहेत. शनिवारी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासंबंधी चर्चा झाली. शशांक बावचकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांची मते आजमावण्यात आली. चर्चेत बोलताना आमदार पी. एन. पाटील यांनी, ‘जिल्ह्यात काँग्रेसची ताकत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक लढवावी. त्यांचे उत्तम नेटवर्क आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी. कोल्हापुरातून काँग्रेसचा खासदार निवडून येईल.”पी.एन.पुढे म्हणाले,” काँग्रेसकडून जो निर्णय येईल त्यानुसार जिल्ह्यातील काँग्रेसची मंडळी काम करतील आणि जो उमेदवार असेल त्यांना निवडून आणू.’ त्यावर आमदार सतेज पाटील यांनी, ‘आमदार पी. एन. पाटील हे सिनीअर आहेत. सिनीअर मंडळी लोकसभेत असतात. तुम्ही लोकसभेवर जावा. काँग्रेस पक्षाकडे जागा मिळाल्यास उमेदवार निश्चित निवडून येईल. ’अशी टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला. याप्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसची संघटनात्मक ताकतीचा आलेख मांडला. विधानसभा निवडणुकीतील यश, पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेतील स्थान हे उपस्थितांच्या निदर्शनास आणले. पक्षाकडून जो उमेदवार देण्यात येईल त्याला निवडून आणू अशी ग्वाही बैठकीत दिली.