जरा शर्म करा मला दुरुस्त करा.. | 75 वर्षांच्या बंधाऱ्याची आर्त हाक..
गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक पाठ फिरवत आहे. केवळ लोकांना आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करत आहे. खरे तर त्वरित या बंधाऱ्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, केवळ खोटी आश्वासने त्यांच्याकडून मिळत आहेत. लवकरात लवकर बंधारा दुरुस्तीला सुरुवात नाही केली तर कार्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनसम्राट विश्वास बालीघाटे यांनी दिला आहे.
जरा शर्म करा मला दुरुस्त करा.. | 75 वर्षांच्या बंधाऱ्याची आर्त हाक..
शिरढोण/महान कार्य वृत्तसेवा :
कुरुंदवाड, शिरढोण व तेरवाड या तिन्ही गावांना जोडणाऱ्या तेरवाड बंधाऱ्याला 75 वर्षे झाली आहेत. गेल्या 4 वर्षापासून याकामी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, ठेकेदाराने या कामाकडे पाठ फिरविल्याने व पाटबंधारे विभागाच्या केवळ कागदी खेळामुळे त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. मोडलेले पिलर, तुटलेले बंधाऱ्याचे सील, उखडलेला रस्ता व ढासळत चाललेले कठडे यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे तेरवाड बंधाराच आता आर्त हाक देत असल्याचे बोलके चित्र पहायला मिळत आहे.
1948 साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश पाणी अडवण्यासाठी होता. पूर्वी पासूनच या बंधाऱ्यानजीक तिन्ही गावचे मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पादचारी, दुचाकी तसेच काही प्रमाणात अवजड वाहतूकही केली जाते. गेल्या 4 वर्षात निविदा काढून केवळ दुरुस्तीच्या कामाचा खेळखंडोबा सुरू असल्याच्या तिखट भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
शिरढोण, कुरुंदवाड व तेरवाड, हेरवाड या गावातील लोकांची नेहमी या बंधाऱ्यावरून वर्दळ असते. आता पूर्वीच्या तुलनेत वाहतूक कितीतरी पटींनी अधिक वाढली आहे. तसेच वयोमानानुसार बंधाऱ्याला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे झुडुपे उगवलेली आहेत. काँक्रिट निखळल्यामुळे आतील लोखंडी गज बाहेर आले आहेत. बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्याचा भाग जमिनीपासूनच खराब झाला आहे. जुने बांधकाम असल्याने ते बऱ्याच ठिकाणी उखडले आहे. वाहनांतून जाताना बंधाऱ्यावर हादरे जाणवतात. त्यामुळे वाहने आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणाहून नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या बंधाऱ्याची पाहणी करून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
पर्याय नसल्याने या बंधाऱ्यावरून चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहतूकही सुरू आहे. बंधारा बांधला तेव्हा एवढी वाहतूक आणि वजन नक्कीच विचारात घेतलेले नसणार. शिवाय आता हा बंधारा जुना झाला आहे. त्यामुळे त्याच्या मजबुतीकरणाचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. काँक्रीट निखळून गज बाहेर आले असून पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. जुने बांधकाम उखडले असून सध्या बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाची आवश्यकता आहे.