एकसंबा : वार्ताहर
मालिकवाड येथील तीन मंदिरांची कुलूप तोडून दानपेटी फोडत धाडसी चोरी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. बुधवारी सकाळी ही प्रकरणे उघडकीस येताच नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. मंदिरातील चोरी प्रकरण मलिकवाड परिसरात वारंवार निदर्शनास येत असल्याने संशकता निर्माण होत आहे.
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मरगुबाई मंदिर आणि विठ्ठल मंदिरांचे मंगळवारी मध्यरात्री कुलपे तोडून मंदिरात प्रवेश करत देवदेवतांच्या अंगावरील दागिने, समई, मंदिरात असलेले पितळेच्या लहान लहान मुर्त्यांवर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. एकाचवेळी ३ मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने मलिकवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील ग्रामदैवत मसोबा मंदिरातील ही 6 वी घटना असून विठ्ठल मंदिरातील ही तिसरी घटना आहे. सदर घटनेचा पंचनामा क्राईम ब्रांच चे कुमार इलिगार यांनी केला. यावेळी. ग्रामपंचायत परिसरात असलेल्या सीसी टीव्ही से फुटेज पाहिल्यानंतरही काही निष्पन्न झाले नाही.
गेल्या काही महिन्यांपासून मलिकवाडसह परिसरात मंदिरातील चोरीचे प्रकार वाढीस लागले असल्याचे समोर आले असून तपास यंत्रणेसह सांशकता व्यक्त होऊ लागली आहे. याबाबत सदलगा पोलीस स्थानकाकडून मंदिर परीसरात सीसी टीव्ही बसविण्यास मंदिर कमितीना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र याकडे मंदिर कमिटीकडूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. परिणामी या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्याचे आव्हान पोलीस यंत्रनेवर असून यावर गांभीर्याने विचार करून आळा घालण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे