Spread the love

बेंगळुरू 20 मे
कर्नाटकात आज काँग्रेसचे नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक काँग्रेस नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 2018 मध्ये युती सरकारच्या स्थापनेदरम्यान विधानसौदा येथे आयोजित केलेल्या समारंभाप्रमाणे यावेळी देखील बेंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियममध्ये गैरभाजप पक्षांच्या एकतेचे प्रदर्शन करण्यात येईल.
उद्धव ठाकरेंनी फिरवली पाठ – कर्नाटकमध्ये काँग्रेसचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळाचा आज शपथविधी बेंगळुरच्या कांतीराव स्टेडियमवर सुरू आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते, देशभरातील विविध पक्षाचे नेते या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहेत. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले होते. उद्धव ठाकरे यांनी याकडे पाठ फिरवली असून, त्यांच्याऐवजी अनिल देसाई यांना या शपथविधीला पाठवण्यात आले आहे.
काँग्रेसची एकहाती सत्ता – कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला 66, जेडी एस 19 आणि इतरांना चार जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे बहुमताने सरकार आले असून मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी लागली आहे. तर डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. सिद्धरामय्या हे दुसèयांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण आठ आमदार सुरुवातीला शपथ घेणार असल्याचे समजते.
या बड्या नेत्यांची उपस्थिती – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शपथविधीला भाजपशासित राज्य वगळता इतर मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले आहे. याशिवाय विविध राज्यातील प्रादेशिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टेलीन, सपाचे अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांना बोलावले आहे. या शपथविधीला उद्धव ठाकरेबकाही वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहणार नाहीत त्यांच्या ऐवजी शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई, माजी मंत्री सुभाष देसाई यांना पाठवण्यात येणार असल्याचे समजते.
केरळच्या मुख्यमंत्र्यांना डावळले- कर्नाटकमध्ये होत असलेल्या शपथविधी कार्यक्रमाला भाजपशासित राज्य वगळता सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले आहे. केरळमध्ये सत्तेत असलेल्या डाव्या लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना यात डावलण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे पाऊल अपरिपक्व राजकारण आणि कमकुवतपणा दर्शवते, असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.